
पुणेः दिवसा गजबलेल्या असलेल्या स्वारगेट बसस्थानकात फलटणला निघालेल्या २६ वर्षीय तरूणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. बुधवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे पुणे हादरून गेले आहे. पुण्यातील वर्दळीच्या आणि गजबजलेल्या स्वारगेट बसस्थानकात बलात्काराची ही घटना घडल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
२६ वर्षीय पीडित तरूणी पुण्यातून फलटणला जाण्यासाठी निघाली होती. बुधवारी पहाटे स्वारगटे बसस्थानकात आल्यानंतर ती फलटणला बसेस जाणाऱ्या प्लॅटफार्मवर थांबली होती. कुठे जायचे ताई म्हणत एका अनोळखी तरूणाने तिच्याकडे विचारणा केली आणि फलटणला जाणारी बस इकडे लागत नाही, तिकडे लागते, असे सांगितले. माझी बस तेथेच लागते, मी तिकडे जाणार नाही, असे पीडित तरूणीने त्या अनोळखी तरूणाला सांगितले.
त्या अनोळखी तरूणाने गोड बोलून शब्दात अडकवले आणि मी १० वर्षापासून इथे आहे, तिकडे लागणारी बसच फलटणला जाते, असे सांगून पीडित तरूणीला आडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसकडे नेले.
बसमध्ये अंधार होता. त्यामुळे तिला बसमध्ये चढायचे की नाही, हा प्रश्न पडला. त्यावर या नराधमाने रात्रीची बस आहे, लोक झोपल्यामुळे दिवे बंद आहेत. तू वर चढून टॉर्च लावून चेक कर असे सांगितले. त्यानंतर पीडित तरूणी बसमध्ये गेली. तिच्या मागोमाग हा अनोळखी तरूणही बसमध्ये शिरला आणि त्याने बसचे दार बंद करून तिच्यावर बलात्कार केला.
बलात्कार करून नराधम तरूण तेथून पसार झाला. या घटनेनंतर पीडित तरूणी दुसऱ्या बसने फटलणला जायला निघाली. प्रवासात तिने मित्राला फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. मित्राने सांगितल्यानंतर अर्ध्या वाटेवरून ती परत आली आणि तिने स्वारगेट पोलिस ठाणे गाठून पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी तातडीने स्वारगेट बसस्थानकाचे सीसीटीव्ही चित्रिकरण तपासले. चित्रिकरणात आरोपी निष्पन्न झाला. दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५ वर्षे, रा. शिक्रापूर) असे या नराधमाचे नाव असून त्याच्या विरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसात जबरी चोरीचे दोन गुन्हेही दाखल आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथके रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
