समृद्धी महामार्गावर अपघातानंतर एसी स्लीपर बस स्फोट होऊन पेटली, २५ प्रवाशांचा झोपेतच होरपळून कोळसा


बुलढाणाः  विदर्भ ट्रॅव्हल्सच्या नागपूर-पुणे एसी स्लीपर कोच बसला बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. अपघातानंतर डिझेल टँक फुटल्यामुळे बसने पेट घेतला. त्यामुळे २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर आठ प्रवाशी थोडक्यात बचावले.

समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ रात्री दीड वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. बसमध्ये ३२ प्रवाशी होते. त्यापैकी २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये नागपूर, यवतमाळ आणि वर्धा येथील प्रवाशी होते.

पिंपळखुटा गावाजवळ ही बस खांबाला धडकून उजव्या बाजूच्या संरक्षक कठड्यावर आदळली आणि डावीकडे पटली झाली. नंतर काही क्षणातच बसचा डिझेल टँक फुटला आणि बसने पेट घेतला. या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. चालकासह आठ जण बसच्या खिडकीच्या काचा फोडून बाहेर पडल्यामुळे थोडक्यात बचावल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाने आग विझवली. प्रशासनाने प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले. जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांनी घटनास्थळाला भेट दिली.

मृतांची ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान

बसमधील प्रवाशांचे मृतदेह जळून राख झाले. त्यामुळे मृताची ओळख पटवणे कठीण झाले आहे. त्यासाठी डीएनए चाचणीशिवाय पर्याय नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. डीएनए चाचणीबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांशी पोलिसांनी चर्चा केल्याचीही माहिती समोर येत आहे.

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सची बस क्रमांक एमएच २९ बीई-१८१९ या बसला समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा गावाजवळ अपघात झाला. १ जुलैच्या मध्यरात्री १ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. खांबाला टक्कर लागून बसचा बॅलेन्स गेला किंवा ड्रायव्हर सांगतो बसचे टायर फुटले. त्यानंतर बस पुलाला धडकून घसरली. डिझेल टँक फुटून आग लागली. त्यामुळे गाडीचा स्फोट झाला. सगळे झोपेत होते. त्यामुळे २५ जणांचा मृत्यू झाला. केवळ सात ते आठ जणांना बसमधून बाहेर पडण्याची संधी मिळाली. बसमध्ये तीन लहान मुले असल्याचीही माहिती आहे. मृतांची ओळख पटवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे आव्हान आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासने म्हणाले.

अपघातानंतर बसच्या मागील बाजूच्या खिडकीच्या काचांवर हात आपटत काही प्रवाशी मदतीसाठी गयावया करत होते. परंतु आजूबाजूने जाणारे इतर वाहन चालक मदतीसाठी थांबले नाहीत, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

मदतीसाठी इतर वाहने थांबलीच नाहीत…

आग लागल्यामुळे प्रवाशांना आतून काचा तोडणे शक्य झाले नाही. आजूबाजूने जाणारे ट्रक, टेम्पोचालक मदतीसाठी थांबले असते आणि त्यांनी त्यांच्याकडील लोखंडी रॉडने बसच्या काचा फोडल्या असत्या तर मृतांचा आकडा कमी झाला असता, असेही काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

 या अपघातात प्रवाशांकडील मोबाइलही जळून खाक झाल्यामुळे  बसमधील प्रवाशांच्या कुटंबीयांशी किंवा आप्तांशी संपर्क होणेही कठीण झाले आहे. या बसमध्ये वर्ध्यातील सावंगी बायपासहून सहा महिला आणि आठ पुरूष असे १४, नागपूरहून ८ तर यवतमाळहून ३ प्रवाशी बसले होते. खासगी बुकिंग पाँइटवरून प्रवाशांची माहिती मिळवण्याचे काम पोलिस करत आहेत. समृद्धी महामार्गावरील या बस अपघाताबाबत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

 आता तरी सरकारचे डोळे उघडावेतः ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अपघाताबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात २६ जणांचा दुर्दैवी अंत झाला, हे वृत्त मनाला हेलावणारे आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर अपघात सुरूच आहेत. आतापर्यंत ३०० हून अधिक प्रवाशी त्यात मरण पावले. सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाययोजना केल्या नाहीत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना मी श्रद्धांजली अर्पण करत आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

त्वरित उपाययोजना कराः शरद पवार

 राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या अपघाताबद्दल शोक व्यक्त करून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात. एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. अपघात रोखण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही सूचवले होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

समृद्धी हा शापित महामार्ग, अनेकांचे शापः राऊत

समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झाला आहे. समृद्धी महामार्गाला अनेकांचे शाप लागले आहेत. तो शापित का झाला याच्या खोलात जावे लागेल. तो महामार्ग बनवण्यासाठी सरकारने मनमानी केली. याबाबत अनेक गोष्टी आहेत. त्या भविष्यात समोर येतील. पण दुर्दैवाने त्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत, वारंवार मृत्यू होत आहेत. हे काही चांगले नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आम्ही अनेकदा समृद्धी महामार्गावरील वेगमर्यादेची मागणी केली आहे. त्याविषयी काहीच होत नाही. तो रस्ता भ्रष्टाचारातून तयार झाला आहे. त्या रस्त्यासाठी अनेकांच्या जमिनी हडप करण्यात आल्या. जबरदस्तीने जमिनी घेण्यात आल्या. त्या रस्त्याला अनेकांचे शाप आहेत आणि त्या रस्त्यात मला अनेकांचे अश्रू दिसत आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!