‘इंडिया’ आघाडीचे प्रधानमंत्रिपदाचे उमेदवार कोण?, मुंबईतील बैठकीआधीच समोर आली महत्वाची माहिती


नवी दिल्लीः  २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीचे प्रधानमंत्रिपदाचे उमेदवार कोण? अशी चर्चा या आघाडीच्या स्थापनेपासूनच होत आहे. २०२४च्या निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी हेच भाजपच्या नेतृत्वातील एनडीएचे प्रधानमंत्रिपदाचे उमेदवार असतील असे भाजपकडून जाहीर करण्यात आले असतानाच ‘इंडिया’चा प्रधानमंत्रिपदाचा चेहरा कोण? अशी राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे. याबाबत राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत अशोक गेहलोत यांनी इंडिया आघाडीच्या प्रधानमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत महत्वाची माहिती दिली.

काँग्रेस नेते राहुल गांधी हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे प्रधानमंत्रिपदाचे उमेदवार असतील. ‘इंडिया’ आघाडीतील सर्व पक्षांनी चर्चा आणि विचारविनियम केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अशोक गेहलोत यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना दिली.

प्रत्येक निवडणुकीत स्थानिक घटक महत्वाची भूमिका निभावत असतो. परंतु देशातील सध्याच्या परिस्थितीमुळे सर्व पक्षावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. देशातील जनतेनेच असा दबाव निर्माण केला आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांची आघाडी स्थापन झाली आहे, असे गेहलोत म्हणाले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ५० टक्के मते मिळवून सत्तेत येईल, असा दावा केला जात आहे. त्याबद्दल विचारले असता गेहलोत म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना हे कधीही साध्य करता येणार नाही. जेव्हा ते लोकप्रियतेच्या शिखरावर होते, तेव्हा ते त्यांना साध्य करता आले असते. पण आता त्यांना ५० टक्के मते मिळू शकत नाही. उलट त्यांच्या मतांची टक्केवारी आणखी कमी होईल. त्यामुळे २०२४ मध्ये प्रधानमंत्री कोण बनणार? हे आगामी लोकसभा निवडणुकीचे निकालच ठरवतील, असे गेहलोत म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहंकारात राहू नये. २०१४ मध्ये भाजपला केवळ ३१ टक्के मते मिळाली होती. उर्वरित ६९ टक्के मते त्यांच्या विरोधात होती. त्यामुळे गेल्या महिन्यात बंगळुरूमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली, तेव्हापासून एनडीए घाबरली आहे, असा दावाही गेहलोत यांनी केला.

मुंबईतील बैठकीला २६ पक्षांच्या ८० नेत्यांची उपस्थिती

दरम्यान येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होत असून या बैठकीला २६ राजकीय पक्षांचे ८० नेते उपस्थित राहणार आहेत. त्यात एम.के. स्टॅलिन, नितीश कुमार, हेमंत सोरेन, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल या पाच मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरही या बैठकीत विचारविनिमय केला जाईल, असे सांगण्यात येते. इंडिया आघाडीत संभाव्य वाद टाळण्यासाठी ११ जणांची समन्वय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव असून या बैठकीत त्या समितीती सदस्यांच्या नावावरही चर्चा केली जाणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!