मुंबई: महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. महिला बचत गटाच्या वस्तूंच्या विक्रीसाठी आठवडी बाजाराची सुविधा करून देण्यात येईल, असेही लोढा म्हणाले.
परळ येथील मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात लोढा बोलत होते. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, आमदार मनीषा कायंदे आणि अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आज महिला बचत गट उत्तम प्रकारे वस्तूंची निर्मिती करत आहेत. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे बचतगटांची मागणी लक्षात घेता स्थानिक ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी, असे लोढा म्हणाले.
परळच्या महापुरूष दादाभाई सहकारी गृहनिर्माण संस्थेने केलेल्या तक्रार अर्जानुसार स्थानिक प्रशासनाने विकासकाने नियमांचे उल्लंघन केले असल्यास त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. आज १४८९ तक्रारीपैकी दाखल झाल्या असून जागीच १५५ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारींचे देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील असेही ते म्हणाले.
यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.
सॅण्डहर्स्ट रोड येथील बी वॉर्ड येथे रविवार दिनांक ७ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहेत. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत सकाळी १० ते दुपारी ३ वाजता या वेळेत सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.