मुंबईः राज्यात एकीकडे उन्हाची काहिली वाढत चालली असून अनेक शहरांतील तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. अशातच आता ५ एप्रिलपासून महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे ६ ते ९ एप्रिलदरम्यान राज्यात वादळीवारा आणि गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. विदर्भातील ब्रम्हपुरी, मालेगाव, अकोला, मध्य महाराष्ट्रातील जेजुरी आणि सोलापूरसारख्या ठिकाणांचे तापमान ४२ अंश सेल्सिअसरच्या वर गेले आहे. तर राज्यातील बहुतांश शहरांचे तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. उन्हाच्या तडाख्याने जिवाची लाहीलाही होत असतानाच हवामान विभागाने आता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
शुक्रवारपासूनच महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस तर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. ६ ते ९ एप्रिलदरम्यान राज्यात वादळीवारा, मेघगर्जना, गारपीट आणि अवकाळी पाऊस असे चित्र पहायला मिळणार आहे. एकीकडे उष्णतेची लाट आणि त्यात अवकाळी पाऊस असे संमिश्र वातावरण राहणार असल्यामुळे उकाड्यात आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे.