मुंबईः राज्यात जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. जून महिन्याची कसर जुलै महिन्यातील पावासाने भरून निघण्याची शक्यता आहे. राज्यात या आठवड्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील ४८ तासांत राज्यात मुसळधर पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.
जून महिन्यात पावसाचा लपंडाव सुरु होता. राज्याच्या अनेक भागात अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. मात्र जुलै महिना सुरू होताच पावसाने राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली आहे. आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
पुढील ४८ तासांत मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील काही भाग वगळता इतर जिल्ह्यांत चांगला पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, बीड, धाराशिव (उस्मानाबाद), परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यातही धो-धो पावसाची शक्यता आहे.
जुलै महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जुलै महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस असेल. दक्षिण कोकणात पावसाचा जोर अधिक असेल.