मुंबईः राज्यात पुढील पाच दिवस कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार आणि कोकणातील ठाणे तसेच पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील पाच दिवसांसाठी म्हणजेच १६ सप्टेंबर ते २० सप्टेंबरपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला असून या पाच दिवसांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाचे इशारे जारी केले आहेत.
हवामान विभागाने आजच्या दिवसासाठी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील या चार जिल्ह्यांत वेगवान वाऱ्यासह विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
पालघर, ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला आजच्या दिवसासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला असून या जिल्ह्यांत विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे.
उद्या १७ सप्टेंबरसाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नंदूरबार, मुंबई, नाशिक, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रातील धुळ आणि जळगाव जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पुढील दोन-तीन दिवसांत उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची जोर वाढण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
१६ ते १८ सप्टेंबर असे तीन दिवस मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने मुंबईला तीन दिवसांसाठी यलो अलर्ट दिला आहे. १८ सप्टेंबर रोजी मुंबईसह पालघर, ठाणे, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरीत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे.
१९ आणि २० सप्टेंबर रोजी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात जोरदार तर राज्यात विविध ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.१९ आणि २० सप्टेंबर रोजी हवामान विभागाने राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला कोणताही अलर्ट दिलेला नाही.