मुंबईः राज्यभर आज गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी उत्साहाचे वातावरण आहे. राज्यात विविध ठिकाणी गणपती विसर्जनाच्या मिरवणुका सुरू झाल्या आहेत. गणपती बाप्पाला राज्यभर उत्साहात निरोप दिला जात असतानाच बाप्पाला निरोप देण्यासाठी वरूणराजाही सज्ज आहे. हवामान खात्याकडून महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठीचा हवामानाचा अंदाज आज जारी केला आहे. त्यानुसार आज, २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आज २८ सप्टेंबर रोजी मुंबई, रत्नागिरी, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, वर्धा या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ग्रीन अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. पुढील २४ तास महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कायम राहणार असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस असणार आहे.
उद्या २९ सप्टेंबर रोजी कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, लातूर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), ठाणे, रायगड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
महाराष्ट्राच्या उर्वरित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.