मुंबईः राज्यात सर्वदूर पावसाने चांगलाच जोर धरला असून मुंबईत सोमवारी पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. नागपूर-चंद्रपुरातही जोरदार पाऊस सुरू असून हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांत आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आज पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. आज मुंबईसह कोकणातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम झाला असून लोकल गाड्यांची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तिकडे पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतही पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागाने आज विदर्भाला पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावसामुळे विदर्भाच्या काही जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. अत्यंत महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, अशी सूचना नागरिकांना करण्यात आली आहे.
चंद्रपुरात पुरामुळे हाहाकार, मामा तलाव फुटला
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चिचपल्ली गावातील मामा तलाव फुटला आहे. त्यामुळे तीन घरात पाणी शिरले आहे. प्रशासनाने पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. ईरई धरणाचे सातही दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आल्यामुळे रहेमतनगर, नगीनाबाग, सिस्टर कॉलनीसह सखल वस्त्यांत पाणी शिरले आहे.