पुणेः विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येईल तर राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
वारंवार होणाऱ्या हवामान बदलामुळे राज्यात कुठे पाऊल तर कुठे उनाचा तडाखा असे वातावरण पहायला मिळत आहे. मान्सूनही पुढे सरकला असल्यामुळे बहुतांश जिल्ह्यात आज मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे. आज सकाळपासून ते दुपारपर्यंत तापमानात वाढ झालेली असेल तर दुपारनंतर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात मोसमी पाऊस दाखल होईपर्यंत विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधूदुर्ग या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, सोलापूरमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
१५ जूनपासून बहुतांश भागात पाऊसः अंदमान आणि निकोबारच्या बेटावर १९ मेपासून अडकलेल्या नैऋत्य मान्सूनने अखेर वेग घेतला आहे. मान्सून बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि अरबी समुद्रात दाखल झाला असून तो लवकरच केरळ आणि महाराष्ट्रात दाखल होईल. १५ जूनपासून देशाच्या बहुतांश भागात पावसाला सुरूवात होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मान्सूनचा सध्याचा वेग पाहता १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणात दाखल होऊ शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे.