भारत स्काउट्स आणि गाईड्स संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा, नियमावली तयार करण्यासाठी चार सदस्यीय समिती


मुंबई:  भारत स्काऊट्स आणि गाईड्स संस्थेच्या राज्य मंडळ आणि जिल्हा मंडळाच्या निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी नियमावली तायर करण्यासाठी चार सदस्यीय समितीची स्थापना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे भारत स्काउट्स आणि गाईड्स संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स या संस्थेची निवडणूक घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्यावेळी लोकशाही प्रक्रियेनुसार या संस्थेची निवडणूक होणे आवश्यक असल्यामुळे नियमावली ठरवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी चार सदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

स्काउट्स आणि गाईड्स संस्थेची निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी नियमावली तयार करण्यासाठी नियुक्त समितीने राज्य कार्यकारी मंडळाची स्थापना, युवा कार्यक्रम आणि प्रशिक्षणासंबंधी विविध कार्यक्रम, राज्यसंस्थेच्या पुढील वाटचालीसंबंधी, कामकाजासंदर्भात मार्गदर्शन करणे, जिल्हा समित्या नेमणे यासंदर्भात अहवाल सादर करावा. त्यानंतर राज्य संस्थेच्या उपविधीत बदल करण्यासाठी भारत स्काउट्स आणि गाईड्स राष्ट्रीय कार्यालय, नवी दिल्ली या संस्थेकडून मान्यता घ्यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स संस्थेच्या तत्कालीन उपविधीनुसार निवडणूक प्रक्रियेद्वारे अध्यक्ष आणि राज्य मुख्य आयुक्त यांची नियुक्ती होत होती. निवडून आलेल्या या पदाधिकाऱ्यांचा कालावधी पाच वर्षे होता. या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात नियमांचे पालन न करता सेवाप्रवेश नियमांमध्ये नियमबाह्य बदल करणे व इतर प्रशासकीय बाबतीतील गैरप्रकाराच्या  तक्रारींबाबत चौकशी होऊन जुलै २०२० मध्ये राज्य मंडळ व राज्य कार्यकारी समिती या दोन्ही समित्या शासनाने बरखास्त केल्या होत्या.

या बैठकीस क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार विजयसिंह पंडित, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, क्रीडा व युवक कल्याण आयुक्त हिरालाल सोनवणे,  क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे,  भारत स्काउट्स आणि गाईड्स नवी दिल्लीचे राजकुमार कौशिक व महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स संस्थेचे पदाधिकारी शोभना जाधव, आर.डी.वाघ, शरद दळवी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

स्काऊट गाईड ही एक चळवळ आहे. महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स ही संस्था राज्यात विशेषतः ग्रामीण भागात शालेय विद्यार्थी, युवक-युवतींमध्ये नेतृत्व, समाजसेवा, पर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्यांचा विकास घडवण्याचं काम करत आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!