नागपुरात मुसळधार पावसाचा धुमाकुळ: रस्ते पाण्याखाली बुडाले, घरातही पाणीच पाणी, एनडीआरएफ-एसडीआरएफच्या तुकड्या तैनात


नागपूरः नागपुरकरांनी ढगफुटीसदृश्य पाऊस पहिल्यांदाच अनुभवला. नागपुरात रात्रभर मुसळधार पावसाने धुमाकुळ घातल्यामुळे रस्ते पाण्याखाली बुडाले असून लोकांच्या घरातही पाणी शिरले आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आज शाळांना सुटी जाहीर केली आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

शुक्रवावारी मध्यरात्री दोन वाजेपासून पहाटे पाच वाजेपर्यंत नागपूर शहरात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू होता. रात्रभर अखंड बरसलेल्या पावसाने नागपूर शहरातील अनेक परिसर पुराच्या पाण्यात बुडाले. अनेक भाग जलमय झाले असून त्यामुळे रहिवाश्यांत हाहाकार उडाला आहे.

सुमारे तीन ते चार तासांत कोसळलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पंचशील चौक, सीताबर्डी, व आजूबाजूच्या परिसराला बसला. पंचशील चौकातील अनेक रूग्णालयांच्या तळघरात पाणी शिरले. या परिसरात चार ते पाच फूट पाणी साचल्यामुळे रुग्णवाहिकांसह अनेक वाहने पाण्याखाली आली.

हवामान विभागाने नागपूरसह विदर्भाला आधीच मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. अजूनही नागपुरात जोरदार पाऊस सुरू असून प्रशासनाने शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. नागपुरात गेल्या २४ तासांत विक्रमी पाऊस झाल्यामुळे अनेक घरांत पाणी शिरले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक वाहने आणि घरातील चिजवसतू पाण्याखाली बुडाल्या आहेत.

शंकरनगर, अंबाझरी आणि कॉर्पोरेशन कॉलनीजवळील परिसर पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. मोरभवन शहर बसस्थानक आणि स्थानकातील बसेस अर्ध्याहून अधिक पाण्याखाली गेल्या आहेत. नागपूर रेल्वेस्थानकातील रेल्वे रूळ प्लॅटफॉर्मपर्यंत भरल्यामुळे अनेक गाड्यांना उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नागपूरमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या दोन तुकड्या मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना तातडीने मदत करण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी दिल्या आहेत.

मदत आणि बचाव कार्याला वेग

  • या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एसडीआरएफच्या २ तुकड्या ७ गटात विभागण्यात आल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे.
  • एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमूंनी आतापर्यंत १४० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. मुकबधीर विद्यालयातील ४०विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
  • नागपूर शहराच्या विविध भागात २ एनडीआरएफ चमू बचाव कार्यात आहेत. अग्निशमन दलसुद्धा मदत कार्यात आहे.
  • अंबाझरी परिसरात लष्कराच्या २ तुकड्या पोहोचत आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

आजही अतिवृष्टीचा इशारा

दरम्यान, हवामान विभागाने पश्चिम विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. उर्वरित विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!