मुंबईः लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आज पाच उमेदवारांची घोषणा केली. विशेष म्हणजे या उमेदवारांची घोषणा प्रकाश आंबेडकर यांचे टोकाचे राजकीय मतभेद असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना बारामतीत पाठिंबा जाहीर केला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात मनसेतून बाहेर पडलेले मराठा नेते वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर एकेकाळी भारिप-बहुजन महासंघाचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातून अविनाश भोसीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भोसीकरांच्या उमेदवारीमुळे भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना जागा वाचवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेले फायरब्रँड नेते वसंत मोरे हे लोकसभेसाठी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. पुण्याची जागा काँग्रेसला सुटल्यामुळे शरद पवार त्यांना तिकिट देण्याचा शब्द देऊ शकले नाही. प्रस्थापित राजकीय पक्षांनी उमेदवारी नाकारल्यामुळे उमेदवारीपासून ‘वंचित’ झालेल्या मोरेंनी मग वंचित बहुजन आघाडीच्या पर्यायाची चाचपणी केली. वसंत मोरे यांनी राजगृहावर जाऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती आणि लोकसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा केली होती.
प्रकाश आंबेडकरांनी वसंत मोरेंना नाराज न करता पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. पुण्यातील राजकीय समीकरणे पाहून वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर केली आहे. पुण्यात काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर तर भाजपकडून मुरलीधर मोहोळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता वसंत मोरेंच्या उमेदवारीमुळे पुण्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
नांदेडमध्ये भोसीकर, चिखलीकरांचा पाय ‘चिखला’त
वंचित बहुजन आघाडीने आज जाहीर केलेल्या उमेदवार यादीत नांदेड लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. नांदेडमधून अविनाश भोसीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकेकाळी नांदेड हा भारिप-बहुजन महासंघाचा बालेकिल्ला होता. मागच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांनी पावणेदोन लाखांच्या आसपास मते मिळवली होती. त्यामुळे तेव्हाचे काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांना पराभवाची धुळ चाखावी लागली होती.
आता नांदेडमध्ये उमेदवार निश्चित करताना ओबीसी, दलित आणि मुस्लिम मतांची बेरीज-वजाबाकी मांडण्यात आलेली दिसते. त्यामुळेच अविनाश भोसीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भोसीकर हे लिंगायत समाजाचे आहेत. नांदेड मतदारसंघात भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्या होणारे मराठा मतांचे विभाजन आणि ओबीसी-दलितांची एक गठ्ठा मते असा विचार करून ही उमेदवारी दिल्यामुळे प्रताप पाटील चिखलीकरांना ही निवडणूक अवघड होऊन बसली आहे.
बारामतीत उमेदवार न देण्याचा निर्णय
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते शरद पवार यांच्यात टोकाचे मतभेद आहेत. असे असतानाही वंचित बहुजन आघाडीने बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असून शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केला आहे. हा निर्णय घेऊन प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी ही भाजपची ‘बी टीम’ आहे, असा प्रचार करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (शप) मोठी चपराक दिल्याचे मानले जात आहेत.
‘वंचित’चे पाच उमेदवार असे
- नांदेडः अविनाश भोसीकर (लिंगायत)
- परभणीः बाबासाहेब उगाळे (मराठा)
- छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): अफसर खान (मुस्लिम)
- पुणेः वसंत मोरे (मराठा)
- शिरूरः मंगलदास बांदल (मराठा)
सुप्रिया सुळेंनी मानले प्रकाश आंबेडकरांचे आभार
बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार न देता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या निर्णयाबद्दल या मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी वंचित बहुजन आघाडीचे आभार मानले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने माझ्याविरुद्ध उमेदवार न देण्याची भूमिका घेत पाठिंबा जाहीर केला आहे. याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा. प्रकाश आंबेडकर यांचे मनापासून आभार मानते. आपण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात ही माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब आहे. संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी आपण सदैव एकत्रित काम करू, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.