वडवणीच्या वैष्णवी महाविद्यालयात प्राध्यापकांकडून सहसंचालकांच्या नावानेच खंडणी वसुली, तंगडे तोडीच्या धमक्यांमुळे गुरूजी भयभीत!


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): जाफ्राबादच्या सिद्धार्थ महाविद्यालयाने निवृत्त दिवंगत प्राचार्यांची सातव्या वेतन आयोगानुसार जीपीएफ आणि महागाई भत्त्याची रक्कम हडपल्याचे प्रकरण ताजे असतानाच बीड जिल्ह्यातील वडवणी येथील वैष्णवी महाविद्यालयात प्राचार्य आणि संस्थाचालकांकडून वेतन देयक जमा करण्यासाठी चक्क सहसंचालकांच्या नावानेच दरमहा सक्तीने खंडणी वसुली करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे  महाविद्यालयाचे ‘नॅक’ करून घेण्यासाठी प्रत्येकी दोन लाख रुपये जमा करा, अन्यथा तंगडे तोडू अशी धमकीच संस्थाचालकाने दिल्यामुळे येथील प्राध्यापक भयभीत झाले आहेत.

बाहेगव्हाणच्या साहेबराव मस्के पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे बीड जिल्ह्यातील वडवणी येथे वैष्णवी महाविद्यालय अशासकीय अनुदानित महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात प्राचार्य आणि संस्थाचालकांकडून शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची अक्षरशः आर्थिक लूट आणि मानसिक छळ सुरू आहे. या आर्थिक आणि मानसिक छळामुळे महाविद्यालयातील प्राध्यापक प्रचंड तणावाखाली असून ते भयभीत झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील विभागीय सहसंचालक कार्यालयात दरमहिन्याचे वेतन देयक जमा करण्याच्या नावाखाली या महाविद्यालयाचे प्राचार्य हे प्राध्यापकांकडून दरमहा सक्तीने खंडणी वसूल करत असल्याची तक्रार या महाविद्यालयातील आठ प्राध्यापकांनी राज्याचे उच्च शिक्षण संचालक, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय सहसंचालक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली आहे.

वैष्णवी महाविद्यालयाचे ‘नॅक’ मूल्यांकन करून घेण्यासाठी प्रत्येक प्राध्यापकांना दोन लाख रुपये जमा करण्याचे फर्मान संस्थाचालकांनी सोडले. ही रक्कम जमा करण्यास नकार दिल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय मस्के यांनी २६ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास सर्व प्राध्यापकांना बोलावून घेऊन पैसे जमा करण्यासाठी धमकावले आणि पैसे जमा न केल्यास तंगडे तोडण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, असे या प्राध्यापकांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

प्राचार्य आणि संस्थाचालकांनी अद्याप कोणत्याही कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तिकेची द्वितीय प्रत दिलेली तर नाहीच शिवाय सेवा पुस्तिकेची मूळ प्रतही वेळेवर अद्ययावत करण्यात येत नाही. महाविद्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्यांना नियुक्ती व स्थाननिश्चिती झाल्यानंतर विद्यापीठाकडून मिळालेल्या मान्यतेची मूळ प्रतही देण्यात आलेली नाही.

 ‘कॅस’अंतर्गत स्थान निश्चिती आणि वरिष्ठ वेतनश्रेणी मिळालेल्या प्राध्यापकांचे थकीत वेतन प्राचार्यांच्या वेतन खात्यात जमा झाले. परंतु नियम धाब्यावर बसवून प्राचार्यांनी ते संबंधित प्राध्यापकांच्या खात्यावर अद्यापही जमा केलेले नाही. तर काही प्राध्यापकांचे स्थान निश्चितीचे थकीत वेतन अजूनही सहसंचालक कार्यालयात सादरच करण्यात आले नाही, त्यामुळे हे प्राध्यापक कॅसच्या आर्थिक लाभापासून वंचित राहिले आहेत.

इतर महाविद्यालयातील प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगानुसार फरकाच्या रकमेचा चौथा हप्ता केव्हाच मिळालेला असताना वैष्णवी महाविद्यालयातील प्राध्यापकांना तो अद्यापही देण्यात आला नाही.

या महाविद्यालयात रूजू होताना प्राध्यापकांना धमकावून प्रत्येकाकडून एलआयसीच्या १० पॉलिसी काढून घेण्यात आल्या. परंतु या पॉलिसीचे दस्तावेज अद्यापही या प्राध्यापकांना देण्यात आले नाहीत, अशी या प्राध्यापकांची तक्रार आहे. गंभीर बाब म्हणजे राज्य सरकारने ठरवून दिलेल्या किरकोळ रजा आणि वैद्यकीय रजाही प्राचार्य मंजूर करत नाहीत, असेही या प्राध्यापकांनी तक्रारीत नमूद केले आहे.

जिवितास धोका, घातपाताचीही शक्यता

मागील दोन महिन्यांपासून कोणत्याही कर्मचाऱ्यांना प्राचार्य आणि संस्थाचालकांनी हजेरी पटावर स्वाक्षरी करू दिलेली नाही, असा गंभीर आरोपही या प्राध्यापकांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे आम्ही भयभीत झालो असून कर्तव्य बजावण्यासाठी महाविद्यालयात गेलो तर आमच्या जिवितास धोका निर्माण होण्याची आणि घातपात होण्याची शक्यता आहे, अशी भीतीही या प्राध्यापकांनी व्यक्त केली आहे.

न्याय द्या, अन्यथा आत्मदहन!

संस्थाचालकांनी जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे २७ सप्टेंबरपासून प्राध्यापक महाविद्यालयात गेलेच नाहीत. आता संस्थाचालक आणि प्राचार्यांकडून होत असलेल्या आर्थिक आणि मानसिक जाचातून आमची सुटका करा आणि आम्हाला न्याय द्या, अन्यथा आम्हाला आत्महदहन करण्याशिवाय अन्य पर्यायच उरणार नाही, असेही या प्राध्यापकांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रार अर्जावर डॉ. जी.जे. दुबाले, डॉ. जी. व्ही. शित्रे, प्रा. पी.आर. शेंडगे, प्रा. के.व्ही. केळे, डॉ. सौ. आर. एल. चौधरी, प्रा. एम.बी. सोळंके, प्रा. एल.एन. चव्हाण आणि डॉ. डी.ए. खोसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!