नांदेड/मुंबईः नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश आहे.
ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. या घटनेमुळे आरोग्य विभागावर सर्व स्तरातून जोरदार टीका झाली होती. या घटनेला एक महिनाही उलटत नाही तोच आता नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयांत औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधांचा पुरवठा होत नसल्यामुळे जीव गमावावा लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेडच्या सरकारी रुग्णालयात समोर आला आहे.
गेल्या २४ तासांत या रुग्णालयात २४ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात १२ नवजात बालकांचाही समावेश आहे. रुग्ण गंभीर होते. मृतांमध्ये बाहेरच्या रुग्णांचा समावेश आहे, असे स्पष्टीकरण नांदेडच्या शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी दिले आहे. परंतु या घटनेमुळे आरोग्य विभागाची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत.
नांदेडमध्ये घडलेल्या या मृत्यूच्या तांडवावरून राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारला धारेवर धरले आहे. महिन्यापूर्वीच ठाण्यात अशी घटना घडून गेल्यानंतरही राज्याच्या आरोग्य खात्याला जाग आली नाही का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. नांदेडमधील नवजात बालकांच्या मृत्यूला शासन जबाबदार आहे. शासन अजून किती सर्वसामान्य लोकांचे बळी घेणार आहे? असा सवालही राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करून विचारला आहे.
तातडीने मंत्र्याचा राजीनामा घ्याः खा. सुळे
नांदेड मधल्या शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासात १२ नवजात बालकांसह २४ जणांचा मृत्यू झाला. हे मृत्यू केवळ योगायोग नक्कीच नाहीत. या प्रत्येक मृत्यूची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. एका दिवसात एवढे मृत्यू होत असतील तर त्याचे गांभीर्य मुख्यमंत्री आणि यंत्रणेने लक्षात घेऊन तात्काळ चौकशीचे आदेश देणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांचा राजीनामा तातडीने घेतला पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
ठाण्याच्या घटनेच्या वेळी दाखवलेला बेदरकारपणा आणि बेफिकीरी यावेळी देखील दिसतेय. लपवाछपवी सुरु असून एकमेकांच्या चुकांवर पांघरूण घालण्याचे उद्योग सुरू आहेत. रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना वेळेवर औषधे मिळाली नसल्याचा आरोप होत आहे. याचा अर्थ, महाराष्ट्रातील जनतेचे जीव एवढे स्वस्त झाले आहेत का?, असा सवालही सुळे यांनी केला आहे.
यामध्ये दिरंगाई आणि दुर्लक्षाची बाब दिसत असून कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करुन राज्याच्या संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणीही खा. सुळे यांनी केली आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.