
नवी दिल्लीः आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असलेल्या आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या सिंगल गर्ल चाईल्डसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २००५-०६ या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर इंदिरा गांधी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. कुटुंबातील एकुलत्या एक मुलीच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत एकुलत्या एक मुलीच्या उच्च शिक्षणाचा थेट खर्च उचलला जातो.
भारतातील विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांत पूर्णवेळ नियमित पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी एकुलत्या एक मुलगी असलेल्या निवड उमेदवारांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते. दरवर्षी सुमारे ३००० मुलींना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु या संख्येला कोणतीही मर्यादा नाही.
दोन वर्षे कालावधीसाठी देण्यात येणाऱ्या या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत वार्षिक ३६ हजार २०० रुपये म्हणजेच एकूण ७२ हजार ४०० रुपये शिष्यवृत्ती लाभार्थी मुलीच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या (डीबीटी) माध्यमातून लाभार्थी मुलीच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची ही रक्कम जमा केली जाते.
काय आहेत अटी-शर्ती?
- ही योजना अशा एकुलत्या एक मुलींना लागू आहे की, जिने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठात किंवा पदव्युत्तर महाविद्यालयात पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला आहे. ही शिष्यवृत्ती केवळ पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेल्या मुलींसाठीच उपलब्ध आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेताना मुलीचे वय ३० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे. म्हणजेच ३० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुली या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.
- विशेष म्हणजे या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. म्हणजेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कितीही असले तरी या योजनेसाठी अर्ज करता येतो.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी असली पाहिजे. ज्या कुटुंबात फक्त मुलीच आहेत आणि एकही मुलगा नाही, अशा कुटुंबातील मुलीही या योजनेसाठी पात्र आहेत. जुळ्या बहिणीही या योजनेसाठी पात्र आहेत.
कोणते अभ्यासक्रम?
ही शिष्यवृत्ती केवळ बिगर व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच दिली जाते. त्यात एम.ए., एम.एस्सी., एम.कॉम.सारख्या सर्वसाधारण पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. मात्र, अभियांत्रिकी, वैद्यकीय, लॉसारख्या अन्य व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या मुली या शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र असणार नाहीत. दूरस्थ शिक्षण किंवा ओपन लर्निंग मोडद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
कुठे करायचा अर्ज?
या शिष्यवृत्ती योजनेसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ( https://scholarships.gov.in/) अर्ज करता येतो. इच्छुक विद्यार्थिनी या पोर्टलवर नोंदणी करून Post Graduate Indira Gandhi Scholarship For Single Girl Child हा पर्याय निवडून अर्ज करू शकतात. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्याबरोबर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येईल.
