छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी शोध समितीने कुलपती किंवा राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे दिलेली अंतिम पाच जणांची नावे न्यूजटाऊनच्या हाती आली असून छपत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) ‘चारसौ बीस’ डॉ. सतीश पाटील आणि ‘दागी’ डॉ. भारती गवळी यांचा पत्ता कट झाला आहे. न्यूजटाऊनने या दोघांचा भंडाफोड केला होता. कुलपती १९ डिसेंबरला या पाच जणांच्या मुलाखती घेणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्र.गो. येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे.
कुलपतींनी एआयसीटीईचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्ध यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या कुलगुरू शोध समितीने प्राप्त झालेल्या अर्जांपैकी शॉर्टलिस्ट केलेल्या २४ जणांच्या २६ नोव्हेंबर रोजी मुलाखती घेऊन बंद लिफाफ्यात पाच जणांची नावे फायनल करून कुलपतींकडे पाठवली.
कुलगुरू शोध समितीने राज्यपालांकडे पाठवलेल्या पाच जणांमध्ये कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्रा. विजय जनार्दन फुलारी, नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या फार्मास्युटीकल सायन्स विभागाचे प्रा. राजेंद्र बळीराम काकडे, शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रा. ज्योती प्रफुल्ल जाधव, पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गणित विभागातील प्रा. विलास शेषराव खरात आणि याच विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. संजय दागा ढोले या पाच जणांचा समावेश असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
कुलगुरू शोध समितीने या मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या २४ जणांमध्ये अवैध गुणवाढ प्रकरणात ४२० चा गुन्हा दाखल असलेले आणि परीक्षेच्या कामातून कायमस्वरुपी बंदी घातलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागातील प्रा. डॉ. सतीश पाटील आणि परीक्षेच्याच कामात अनियमिततेचा ठपका तसेच १२७ कोटींच्या घोटाळ्यातील संशयित आरोपी असलेल्या याच विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक डॉ. भारती गवळी यांचाही समावेश आहे. न्यूजटाऊनने या दोघांच्या बाबतीत भंडाफोड केल्यानंतर वाद निर्माण झाला होता.
न्यूजटाऊनने डॉ. सतीश पाटील आणि डॉ. भारती गवळींबाबत भंडाफोड केल्यानंतर अनेकांनी कुलगुरू शोध समितीशी संपर्क साधून आक्षेप नोंदवले. काही जणांनी तर थेट राज्यपाल तथा कुलपतींकडे लेखी तक्रारी केल्या. त्यानंतर कुलगुरू शोध समितीचे नोडल ऑफिसर म्हणून काम पहात असलेले श्रीनगर एनआयटीचे प्राध्यापक डॉ. जानीबुल बशीर यांनी शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार जोपर्यंत क्लिअरन्स दाखवणार नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांच्या मुलाखती घेणार नाही, असे आश्वासन दिले होते.
आता न्यूजटाऊनच्या हाती आलेली पाच जणांची खात्रीलायक नावे पाहता कुलगुरू शोध समितीने डॉ. सतीश पाटील आणि डॉ. भारती गवळी यांचा पत्ता कट केल्याचे स्पष्ट झाले आहे.
१९ डिसेंबरला पाच जणांच्या मुलाखती
कुलगुरू शोध समितीने शिफारस केलेल्या पाच उमेदवारांच्या आता थेट कुलपती तथा राज्यपाल १९ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. या मुलाखतीनंतर राज्यपाल तथा कुलपती कोणाच्या गळ्यात कुलगुरूपदाचा ‘फुलहार’ घालतात, याकडे उच्च शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.