धाराशिव(उस्मानाबाद): महाराष्ट्राची कुलस्वामिनी अशी ख्याती असलेल्या तुळजा भवानी मंदिरात आता तोकडे कपडे घालणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानने मंदिर परिसरात तशा आशयाचे फलकच लावले आहेत. मंदिर प्रशासनाच्या या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. बहुतांश लोकांनी मंदिर प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध केला आहे.
अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पॅन्ट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही. कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा, असे फलक तुळजा भवानी मंदिर संस्थानने मंदिराच्या परिसरात ठिकठिकाणी लावले आहेत.
तुळजा भवानी मंदिर परिसरात मंदिराच्या महाद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत विविध ठिकाणी अशा प्रकारचे लावण्यात आले आहेत. सोशल मीडियावर हे फलक व्हायरल होत आहेत.
या निर्णयामुळे तुळजा भवानी मंदिरात प्रवेश करायचा असेल तर मंदिर प्रशासनाने ड्रेसकोडबाबत जारी केलेल्या या नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. तोकडे, उत्तेजक कपडे, हाफ पँन्ट, बर्मुडासारखे अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणाऱ्यांना मंदिर प्रवेशास मज्जाव केला जाईल.
नव्या नियमांनुसार आता मंदिर किंवा मंदिर परिसरात वन पीस, शॉर्टस स्कर्ट, शॉर्ट पँन्ट परिधान करून येता येणार नाही. हा नियम मुली, महिलांबरोबरच पुरूषांनाही लागू असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली १८ मे रोजी मंदिर परिसरात हे फलक लावण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे ऑक्टोबर २०१८ मध्ये नवरात्र उत्सवादरम्यान कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर संस्थानने असाच निर्णय घेतला होता. शिर्डीमध्येही अशाप्रकारचे फलक लावले होते. पण लोकांच्या विरोधानंतर हे फलक काढून टाकण्यात आले होते. या घटना ताज्या असतानाच आता तुळजा भवानी मंदिर प्रशासनाने असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.