
मुंबईः महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारितील सर्वच टोल नाक्यावर आजपासून फास्टॅगद्वारेच टोल वसुली करण्यात येणार आहे. एमएसआरडीसीच्या सर्वच टोल नाक्यावरील हायब्रीड मार्गिका आजपासून बंद करण्यात आल्या असून रोखीने टोल भरणाऱ्या वाहनधारकांकडून दुप्पट टोल वसुली करण्यात येणार आहे.
एमएसआरडीच्या टोल नाक्यावर आधी फास्टॅगबरोबरच हायब्रीड पद्धतीने टोल वसुली करण्यात येत होती. त्यामुळे टोल नाक्यावर दोन मार्गिका हायब्रीड पद्धतीच्या ठेवण्यात आल्या होत्या. या हायब्रीड मार्गिकांवर रोख, स्मार्ट कार्ड, पीओएस, डेबिट कार्ड, क्यूआर कोड आदीद्वारे टोल स्वीकारला जात होता.
एमएसआरडीने आजपासून (१ एप्रिल) या हायब्रीड मार्गिका बंद करून सर्वच मार्गिकांचे फास्टॅग मार्गिकांमध्ये रुपांतर केले आहे. त्यामुळे एमएसआरडीसीमार्फत टोल वसुली होणाऱ्या नऊ रस्ते प्रकल्पांतर्गच्या सर्वच टोल नाक्यावर आता केवळ फास्टॅगमार्फतच टोल वसुली होणार आहे. नव्या निर्णयामुळे फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांकडून दुप्पट टोल वसुली करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आपल्या वाहनांना फास्टॅग बसवून घ्यावा, असे आवाहन एमएसआरडीकडून करण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गावर आजपासून १९ टक्के जास्तीचा टोल
एमएसआरडीने समृद्धी महामार्गावरील पथकरात तब्बल १९ टक्के वाढ केली असून वाढीवर टोलची आजपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या कार आणि हलक्या वाहनांना प्रतिकिलोमीटर १.७३ रुपयांऐवजी २.०६ रुपये टोल आकारणीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई ते नागपूर प्रवासासाठी कारचालकांना १ हजार ४४५ रुपये टोल भरावा लागणार आहे. एमएसआरडीसीने केलेल्या टोल वाढीमुळे कारचालकांना नागपूर ते इगतपुरी प्रवासाठी सध्याच्या १ हजार ८० रुपयांऐवजी १ हजार २९० रुपये टोल भरावा लागणार आहे. हे नवीन टोल दर पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच ३१ मार्च २०२८ पर्यंत लागू राहतील.