HMPV Virus:  भारतात आढळले एचएमपीव्ही विषाणूची लागण झालेले तीन रूग्ण, केंद्राने जारी केले निवेदन


नवी दिल्लीः चीनमध्ये झपाट्याने पसरत असलेल्या मानवी मेटान्यूमो व्हायरस म्हणजेच एचएमपीव्ही विषाणूची लागण झालेले तीन रूग्ण भारतात आढळून आले आहेत. त्यापैकी दोन रूग्ण कर्नाटकमध्ये तर एक रुग्ण गुजरातमध्ये आढळून आला आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) नेटवर्क लॅबॉरेटरीजच्या नियमित तपासणी दरम्यान हे रुग्ण आढळून आले आङेत. विशेष म्हणजे एचएमपीव्ही विषाणूची लागण झालेल्या एकाही रुग्णाने आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही.

एचएमपीव्ही विषाणूच्या भारतातील परिस्थितीबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जारी करून माहिती दिली आहे. एचएमपीव्ही विषाणू भारतासह जागतिकस्तरावर आधीपासूनच प्रसारित झाला आहे. विविध देशांमध्ये एचएमपीव्हीशी संबंधित श्वसन आजारांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.

या विषाणूच्या संसर्गावर लक्ष ठेवले जात असताना भारतातही याची तीन प्रकरणे आढळून आली आहेत. या तिन्ही रुग्णांनी कुठलाही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही. म्हणजेच भारतात आढळलेल्या या संसर्गाचा आणि चीनमध्ये वाढलेल्या संसर्गाच्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

भारतात बेंगळुरूच्या बॅप्टिस्ट हॉस्पीटलमधील एका तीन महिन्याच्या मुलीला आणि एका आठ महिन्याच्या मुलाला एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. दोन्ही मुलांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे आढळून आली आहेत. मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर मुलावर उपचार सुरू आहेत.

एचएमपीव्हीचा तिसरा रुग्ण गुजरातच्या अहमदाबादेतील सिव्हिल रुग्णालयात आढळून आला आहे. १५ दिवसांपूर्वी दोन महिन्याच्या बाळाची तब्येत बिघडल्याने त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाळ काही दिवस व्हेंटिलेटरवरही होते. आता तपासणीअंती त्याला एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.

काय आहे एचएमपीव्ही?

एचएमपीव्ही हा एक व्हायरल आजार आहे, जो सर्व वयोगटातील लोकांना श्वास घेताना संसर्गाचे कारण बनतो. हा पॅरामायक्सोव्हिरीडे कुटुंबाशी संबंधित आहे. रेस्पिरेटरी सिंकायटियल व्हायरसशी (आरएसव्ही) त्याचा निकटचा संबंध आहे. एचएमपीव्हीचा संसर्ग खोकलने किंवा शिंकल्यामुळे निघणाऱ्या श्वसनातील थेंब आणि संसर्ग झालेल्या पृष्ठभागाला स्पर्श किंवा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्यामुळे पसरतो.

काय आहेत एचएमपीव्हीची लक्षणे?

बहुतांश व्यक्तींमध्ये खोकला, नाक वाहणे किंवा नाक बंद होणे, घसा खवखवणे आणि ताप अशी लक्षणे दिसतात. छातीमध्ये खरखर, श्वास घेण्यास त्रास, गळा बसणे, खोकला, न्युमोनिया आणि वयोवृद्ध व्यक्तींमध्ये दमा वाढतो. १ वर्षापेक्षा कमी वयाची मुले, वयोवृद्ध नागरिक आणि कमी रोग प्रतिकार शक्ती असलेल्या व्यक्तींना एचएमपीव्ही अधिक गंभीर स्वरुपाच्या श्वसनाच्या आजाराचे एचएमपीव्ही कारण बनू शकतो.

कोणतीही लस नाही

एचएमपीव्हीचा संसर्ग झालेल्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. परंतु जर कुणी फ्लू शॉट किंवा कोरोना लसीचे तीन डोस घेतलेले असतील तर त्याच्याकडे आधीच एचएमपीव्हीविरुद्ध लढण्यासाठी ताकद आलेली असते, असे बेंगळुरूच्या एचसीजी रुग्णालयाचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट विशाल राव यांनी म्हटले आहे.

चीनमध्ये कोरोनासारखा फैलाव

चीनमध्ये एचएमपीव्हीचा संसर्ग कोरोनासारखा झपाट्याने पसरला आहे. संपूर्ण चीनमधून संसर्गाच्या बातम्या येत आहेत. चीन सरकारने अज्ञात संसर्गाशी लढण्यासाठी स्क्रिनिंग, विलगीकरण प्रक्रियेची गती वाढवली आहे. सोशल मीडियावर येत असलेल्या अनेक व्हिडीओमध्ये चीनमधील रुग्णालयातील परिस्थितीत भीषण दिसू लागली आहे. मास्क घातलेले लोक आपला नंबर लागण्याची वाट पहात असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.

घाबरून जाऊ नकाः मुख्यमंत्री फडणवीस

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एचएमपीव्ही संसर्गामुळे घाबरून जाऊ नका,असे आवाहन केले आहे. एचएमपीव्ही या व्हायरसला घाबरण्याचे कारण नाही. प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही. यापूर्वीही हा व्हायरस आला होता. पुन्हा एकदा या व्हायरसचा चंचूप्रवेश होताना दिसतो आहे. या संदर्भात जी नियमावली आहे, ती जाहीर होईल. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राज्यांनाही माहिती देण्याचे ठरवले आहे. या व्हायरसला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. या संदर्भातील कपोलकल्पित माहिती देऊ नका. जी अधिकृत माहिती येईल, तीच माहिती द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!