ऑनलाइन फूड किंवा शॉपिंग ऑर्डर करण्याचा विचार करताय? देशाच्या अनेक भागात आज आणि थर्टी फर्स्टला ऑनलाइन डिलिव्हरी बंद!


नवी दिल्लीः तुम्ही जेवणाची ऑनलाइन ऑर्डर देऊन आज नाताळ आणि ३१ डिसेंबरला थर्टी फर्स्ट साजरा करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला डिलिव्हरी मिळण्याची शक्यता कमीच आहे. ऍमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिग, स्वीगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख फूड डिलिव्हरी आणि ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरील डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी आज (२५ डिसेंबर) आणि ३१ डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाच्या अनेक भागात आज आणि थर्टी फर्स्टला ऑनलाइन फूड किंवा ऑनलाइन शॉपिंगची डिलिव्हरी मिळणार नाही. ऑनलाइन डिलिव्हरीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिघड चालली आहे. त्यामुळे ऑनलाइन डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्यांवर दबाव वाढवण्यासाठी देशव्यापी संपाचे पाऊल उचलण्यात आले आहे, असा कामगार संघटनांचा दावा आहे.

इंडियन फेडरेशन ऑफ ऍपबेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स आणि तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियनने देशव्यापी संपाची हाक घोषणा केली आहे. या संपात मेट्रो सिटी आणि प्रमुख टियर-२ शहरांमधील डिलिव्हरी कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता असल्यामुळे देशाच्या अनेक भागांत आज आणि ३१ डिसेंबर रोजी ऑनलाइन फूड किंवा ऑनलाइन शॉपिंगची डिलिव्हरी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

वेतन आणि कामाची उद्दिष्टे ठरवणाऱ्या अल्गोरिदमवर प्लॅटफॉर्म कंपन्यांचे अतिशय जास्त नियंत्रण आहे. डिलिव्हरीची जोखीम कामगारांवर ढकलली जात आहे. तसेच डिलिव्हरी पोहोचवण्याची कालमर्यादा अतिशय कठोर करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रोत्साहन भत्त्याच्या नियमांमध्ये सतत बदल केले जात आहेत, असा कामगार संघटनांचा दावा आहे.

मागणी जास्त असते तेव्हा आणि सणासुदीच्या काळात ग्राहकांना अन्न आणि पॅकेजेस पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावणारे डिलिव्हरी कर्मचारी गंभीर समस्यांना तोंड देत आहेत. घटलेले उत्पन्न, कामाचे जास्त आणि अनिश्चित तास, वर्क आयडी अचानक ब्लॉक करणे, कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही मूलभूत सुरक्षा किंवा कल्याणकारी योजना नसणे या गंभीर समस्यांचा त्यात समावेश असल्याचे कामगार संघटनांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

‘असुरक्षित कार्यप्रणाली, घटती कमाई आणि संरक्षणाचा अभाव यामुळे डिलिव्हरी कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येत आहे. हा संप न्याय, सन्मान आणि हक्कांची मागणी करण्यासाठी आहे.’
शेख सलाउद्दीन, कामगार नेते

डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी १० मिनिटात डिलिव्हरी देण्याची जाचक अट बंद करावी, तक्रारी हाताळण्यासाठी आणि पेमेंट अयशस्वी होण्याच्या घटना कमी करण्यासाठी ऍप्समध्ये अधिक भक्कम प्रणाली विकसित करावी, डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी निश्चित वेळ, आरोग्य विमा, अपघातांच्या बाबतीत संरक्षण आणि पेन्शनसारखे लाभ देण्यात यावेत, अशा मागण्या या कामगार संघटनांनी केल्या आहेत.या मागण्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी या कामगार संघटनांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे केली आहे. प्लॅटफॉर्म कंपन्यांसाठी कठोर नियम, कामगार कायद्यांची योग्य अंमलबजावणी आणि गिग कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना लागू करण्याची मागणीही या कामगार संघटनांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!