राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आता डॉ. जे. पी. नाईक यांच्या नावाने दिला जाणार, अटी आणि निकषही बदलले!


मुंबई: विद्यापीठ,महाविद्यालय, अभियांत्रिकी, चित्रकला या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार यापुढे आता ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ या नावाने देण्यात येणार आहे. अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. या पुरस्काराचे निकष आणि अटींमध्येही बदल करण्यात आले आहेत.

डॉ. जे. पी. नाईक यांच्या शैक्षणिक कार्याची दखल केंद्र शासनाबरोबरच देश विदेश आणि युनेस्कोने देखील घेतली आहे. त्यांच्या योगदानाबद्दलची कृतज्ञता म्हणून या पुरस्काराला डॉ. जे. पी. नाईक यांचे नाव देण्यात आले आहे. या पुरस्कारांची एकूण संख्या ३१ राहणार आहे.

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता शिक्षकांची होणारी निवड अधिक पारदर्शक आणि गुणवत्तापूर्वक खऱ्या अर्थाने समर्पित भावनेने शैक्षणिक क्षेत्रात अध्ययन, अध्यापन करून मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांची व्हावी याकरिता निवड प्रक्रियेच्या अटी, निकष कार्यपद्धतीत सुधारणा करून सुधारित शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

छाणनी समिती

अंतिम केंद्रीय छानी समिती रचना अध्यक्ष- कुलगुरू,  संचालक-उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, कला संचालनालय आणि दोन विषयतज्ञ हे सदस्य असतील तर सहसंचालक, उच्च शिक्षण (मुख्यालय) हे सदस्य सचिव असतील.

राज्यस्तरीय निवड समिती समितीचे अध्यक्षः उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उपाध्यक्षःउच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री, तर अपर मुख्य सचिव, राज्यातील दोन मान्यवर शिक्षण तज्ञ्ज हे सदस्य असतील. संचालक, उच्च शिक्षण सदस्य सचिव हे असणार आहेत.

नव्या निकषात काय?

प्राचार्य, महाविद्यालय व विद्यापीठांतील शिक्षकांसाठीच्या या राज्यस्तरीय पुरस्कारांच्या निकषात नॅक मूल्यांकन व पुनर्मूल्यांकनाबाबत केलेली कार्यवाही, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने केलेली विशेष कार्यवाही यावर प्राचार्यांसाठी भर देण्यात आला आहे. तर शिक्षकांसाठी त्यांनी प्रकाशित केलेले शोधनिबंध, विद्यार्थी व महाविद्यालय विकासासाठी राबवलेले उपक्रम आणि शिक्षकाच्या अध्यापन विषयातील मागील पाच वर्षांतील उत्तीर्णचे प्रमाण असे निकष ठेवण्यात आले आहेत. उत्तीर्णतेचे प्रमाण ८० टक्केपेक्षा जास्त असेल तरच गुण दिले जाणार आहेत.

प्राथमिक अटी व निकष यांचे पालन करणाऱ्या प्राचार्य/शिक्षकांनाच डॉ. जे.पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत. एखाद्या वर्षी प्राथमिक अटी व निकषांची पूर्तता होत नसल्यास त्या वर्षी त्या प्रवर्गातून हा पुरस्कार दिला जाणार नाही.

प्रस्ताव कसा तयार करावा?

  • संचालक व विद्यापीठांचे कुलगुरु सदर पुरस्कार निवडीसाठी महाराष्ट्र राज्यातील वर्तमानपत्रात जाहिरात देऊन व त्यांच्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय कार्यालयाकरीता परिपत्रक निर्गमित करुन, व्यापक प्रसिद्धी देतील आणि पुरस्कारासाठी अर्ज मागवतील.
  • पुरस्कार इच्छूक प्राचार्य/ शिक्षक अथवा एखाद्या शिक्षकाकरीता शिफारस करणाऱ्या संस्था त्यांचे प्रस्ताव, शासन निर्णयात विहित केलेल्या कार्यपद्धतीने तयार करुन, असे शिक्षक जेथे कार्यरत आहेत त्या शिक्षण संस्था प्रमुखांच्यामार्फत (प्राचार्य/ संचालक इत्यादी) संबंधित विद्यापीठ आणि संचालक यांच्याकडे सादर करतील.
  • राज्यातील सर्व शासकीय पारंपारिक महाविद्यालये /अध्यापक महाविद्यालये / शासकीय शिक्षण संस्था येथील शिक्षकांचे प्रस्ताव, असे शिक्षक जेथे कार्यरत आहेत त्या शिक्षण संस्था प्रमुखांच्यामार्फत (प्राचार्य / संचालक इत्यादी) संबंधित विद्यापीठाकडे पाठवतील.
  • प्रत्येक प्रस्ताव हा शिक्षकनिहाय स्वतंत्र राहील. प्रस्तावाच्या सुरुवातीची पृष्ठे, शिक्षकाची वैयक्तिक माहिती (उदा. शिक्षकाचे नाव, संस्थेचे नाव, जन्मतारीख (वय), शैक्षणिक पात्रता, प्रथम नियुक्तीचा दिनांक, सेवेचा कालावधी इत्यादिबाबतच्या कागदपत्राची राहतील. प्रस्तावात त्यानंतरची पृष्ठे शिक्षकाने प्राथमिक अटी पूर्ण केल्याची प्रमाणपत्रासह क्रमवार कागदपत्रे असतील. प्रस्तावातील त्यानंतरची पृष्ठे त्या-त्या पुरस्काराकरीता जे निकष विहीत केलेले आहेत, त्याची पूर्तता आणि त्याबाबतची प्रमाणित कागदपत्राची असतील.
  • प्रत्येक संचालनालय आणि प्रत्येक विद्यापीठ यांच्याकडे प्राप्त होणारे सर्व प्रस्ताव, संचालक आणि विद्यापीठाचे कुलगुरु त्यांच्यास्तरावर गठीत करण्यात आलेल्या छाननी समितीपुढे ठेवतील व छाननी समिती तपासून, मुल्यांकन करील. विद्यापीठाकडे खालील तीन प्रकारचे प्रस्ताव येतील.
  • हे प्रस्ताव संबंधित कुलगुरु त्यांच्या स्तरावर गठित झालेल्या छाणनी समितीपुढे स्वतंत्रपणे ठेऊन, स्वतंत्रपणे तपासून, मूल्यांकन करतील.
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!