
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): बोगस पदव्यांच्या रॅकेटमुळे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संस्थाचालकांविरुद्धच एल्गार पुकारला असून कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान व सचिव आस्मा खान यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचे अधिकार तत्काळ गोठवून संस्थेवर तातडीने प्रशासकाची नियुक्ती करावी, या मागणीसाठी लाक्षणिक उपोषणाचे हत्यार उपसले आहे. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उद्या रविवारी (१७ ऑगस्ट) सार्वजनिक सुटीच्या दिवशी महाविद्यालयाच्या आवारात दिवसभर लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान, सचिव आस्मा खान व सहसचिव मकसूद खान यांनी संगनमताने विद्यापीठाने स्वतःहून प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती करून मान्यता दिलेल्या प्रभारी प्राचार्या डॉ. शेख कमरून्नीसा बेगम इक्रमोद्दीन यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून निलंबित केले आहे. या निलंबनामुळे कोहिनूर महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांत संतापाची लाट उसळली असून हे निलंबनच नियमबाह्य असल्याचा या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.
प्रभारी प्राचार्यांचे नियमबाह्य निलंबन आणि मझहर खान, आस्मा खान, मकसूद खान आणि विद्यापीठाने मान्यता रद्द केलेले माजी प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांच्या बेकायदेशीर व अनागोदीं कारभाचा निषेध नोंदवण्यासाठी नोंदवण्यासाठी कोहिनूर महाविद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उद्या रविवारी (१७ ऑगस्ट) सकाळी ९ ते सायंकाळी ६ यावेळेत महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
या आहेत प्रमुख मागण्या
- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास बाधा आणणाऱ्या, सोयीसुविधांसह निकोप वातावरणापासून त्यांना वंचित ठेवणाऱ्या कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मझहर खान, सचिव आस्मा खान, सहसचिव मकसूद खान व इतर पदाधिकाऱ्यांचे संस्थेतील अधिकार तत्काळ गोठवण्यात यावे.
- खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालय आणि कोहिनूर शिक्षण संस्थेवर तत्काळ प्रशासकाची नियुक्ती करावी.
- हेही वाचाः बोगस पदव्यांवर पीएचडीला प्रवेश घेऊन फसवणूक करणाऱ्या भामट्यांबाबत विद्यापीठाची दुटप्पी भूमिका; दोघांवर गुन्हा, एकाला मात्र ‘माया’वी मोकळे रान!
- कोहिनूर महाविद्यालयाच्या विद्यापीठ मान्यताप्राप्त प्रभारी प्राचार्या डॉ. कमरून्नीसा बेगम यांचे नियमबाह्य निलंबन तत्काळ रद्द करण्यात यावे.
- माजी प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांच्या प्राचार्य काळातील कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
- न्यायालयाच्या आदेशाची, भारतीय संविधानाची आणि कोहिनूर शिक्षण संस्थेच्या घटनेची सातत्याने पायमल्ली करणारे मझहर खान, आस्मा खान, मकसूद खान माजी प्राचार्य शंकर अंभोरे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.
- हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रावर कायमस्वरुपी बंदी, न्यूजटाऊनच्या दणक्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा मोठा निर्णय!
- हुकुमशाही व दडपशाही पद्धतीने कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण व अमानवीय पद्धतीने छळवणूक करणाऱ्या, जिविताची व नोकरीवर काढून टाकण्याची धमकी देऊन स्वतःच्या गुन्ह्यांमध्ये सामील करणारे कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मझहर खान, सचिव आस्मा खान व माजी प्राचार्य शंकर अंभोरे यांना महाविद्यालयाच्या परिसरात कायदेशीर पाबंदी करावी.
- कोहिनूर शिक्षण संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहाराची तत्काळ चौकशी करण्यात यावी.
- हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयात खंडीभर अभ्यासक्रमांसाठी नेमलेले ढीगभर प्राध्यापक कागदोपत्रीच; ना हजेरी, ना पगाराचा पत्ता, चौकशी समितीने केली पोलखोल!
- महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मूळ सेवापुस्तिकांची संगनमताने विल्हेवाट लावणारे माजी प्राचार्य शंकर अंभोरे, संस्थेचे अध्यक्ष मझहर खान, सचिव आस्मा खान, सहसचिव मकसूद खान यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा.
प्रशासक नियुक्तीचा ठराव, पण अद्याप कार्यवाही नाही
कोहिनूर महाविद्यालयातील अनागोंदी कारभाराची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने या महाविद्यालयावर प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी शिफारस करणारा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्याचा निर्णय २६ मे रोजी झालेल्या बैठकीत घेतला होता. व्यवस्थापन परिषदेच्या या ठरावानंतर विद्यापीठ प्रशासनाने तसा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगरच्या उच्च शिक्षण सहसंचालकांमार्फत राज्य शासनाकडे पाठवला आहे.
हेही वाचाः वादग्रस्त कोहिनूर महाविद्यालयावर प्रशासक नेमणार, विद्यापीठ पाठवणार राज्य सरकारकडे प्रस्ताव
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच सहसंचालक कार्यालयामार्फत हा प्रस्ताव अग्रेषित करण्यात आला. परंतु अडीच महिने उलटत आले तरी या प्रस्तावावर कार्यवाही होऊन प्रशासकाची नियुक्ती झालेली नसल्यामुळे कोहिनूर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर लाक्षणिक उपोषणाचे हत्यार उपसण्याची वेळ आली आहे. या लाक्षणिक उपोषणानंतरही कार्यवाही झाली नाही तर कोहिनूर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

