तलाठी भरती परीक्षेचा निकाल कधी?, गुणवत्ता यादी लागणार कधी? वाचा महत्वाचा तारखा आणि रहा अपडेट


पुणेः राज्यातील तलाठ्यांच्या ४ हजार ४६६ रिक्त जागांसाठी घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल कधी लागणार आणि गुणवत्ता यादी कधी लावली जाणार? याची राज्यातील लाखो उमेदवार प्रतीक्षा करत आहेत. आता या संदर्भात मोठी अपडेट हाती आली असून तलाठी भरती परीक्षा दिलेल्या उमेदवारांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांना परीक्षेत पडलेले गुण कळणार आहेत आणि १५ डिसेंबरपर्यंत संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात गुणवत्ता यादी लावण्यात येणार आहे.

राज्यातील तलाठ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारने तलाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. तलाठ्यांच्या ४ हजार ४६६ जागांसाठी राज्यभरातून सुमारे ८ लाख ५६ हजार उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा दिली आहे. आता ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना तलाठी भरती परीक्षेचा निकाल आणि गुणांसह अंतिम गुणवत्ता यादीची प्रतीक्षा आहे.

राज्यात एकूण ५७ टप्प्यात तलाठी भरती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यात घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका जारी करण्यात आली आहे. या नमुना उत्तरपत्रिकेवर हरकती मागवण्यात आल्या आहेत. या हरकती एकत्रित करून ३१ ऑक्टोबरपर्यंत नमुना उत्तरपत्रिका अंतिम करण्यात येणार आहे. त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना गुण कळणार आहेत आणि १५ डिसेंबर रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात गुणवत्ता यादी लावली जाणार आहे.

हरकती नोंदवण्यासाठीही शुल्क वसुली

विशेष म्हणजे तलाठी भरती परीक्षेची जी नमुना उत्तरपत्रिका जारी करण्यात आली आहे, त्या उत्तरपत्रिकेवर उमेदवारांना फुकटात हरकती नोंदवता येणार नाहीत. हरकती नोंदवण्यासाठी १०० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. १६ ऑक्टोबरपर्यंत या सर्व हरकती एकत्रित करून या उत्तरपत्रिका तयार करणाऱ्या गटाकडे पाठवण्यात येणार आहेत. त्यात सुधारणा करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देणअयात आली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम उत्तरपत्रिका जारी करण्यात येईल. त्यानुसार उमेदवारांना परीक्षेत किती गुण मिळाले, हे कळणार आहे, असे जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त तथा परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी सांगितले.

तलाठी भरती परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी १५ डिसेंबरला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात येणार आहे. उमेदवारांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी पुढील महिनाभराचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यानंतर २६ जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरुपात नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!