
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही भू-राजकीय परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्याबाबत विविध प्रकारच्या बातम्या प्रसारित होत असल्या तरी नागरिकांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये. छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यांत घरगुती एलपीजी (एलपीजी) गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून वितरण व्यवस्था नियमितपणे सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने ९ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशात घरगुती एलपीजी उत्पादनाला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार देशातील तेल शुद्धीकरण कंपन्यांना प्रोपेन व ब्यूटेन यांसारख्या घटकांचा वापर प्राधान्याने एलपीजी उत्पादनासाठी करून तो इंडियन ऑईल (आयओसीएल), भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) व हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या एलपीजीचा पुरवठा प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसाठी करण्यात येणार आहे.
घरगुती ग्राहकांना एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहील. तसेच रुग्णालये, शैक्षणिक संस्था यांसारख्या अत्यावश्यक गैर-घरगुती क्षेत्रांनाही आवश्यकतेनुसार एलपीजी पुरवठा करण्यात येणार आहे, असे तेल विपणन कंपन्यांनीही स्पष्ट केले आहे. इतर गैर-घरगुती क्षेत्रांच्या मागण्यांचे परीक्षण करून प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी तेल विपणन कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समितीही स्थापन करण्यात आली आहे.
विभागातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या सुरळीत वितरणासाठी तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हास्तरावर फिरते दक्षता पथक स्थापन करून तपासण्या करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. तसेच घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण नियमित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासही सांगितले आहे.
या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच घाबरून जाऊन अनावश्यक गॅस सिलिंडर साठा करण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासन व तेल विपणन कंपन्या एलपीजीच्या पुरवठ्यावर सातत्याने लक्ष ठेवून असून नागरिकांना मागणीनुसार गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी शांतता राखून आवश्यक तेवढ्याच प्रमाणात एलपीजीचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
