अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यभरात २६ बालविवाह रोखण्यात यश!


मुंबई: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विवाह सोहळ्यांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. परंतु, याच मुहूर्तावर अनेक ठिकाणी बालविवाह होण्याचे प्रकारही समोर येतात. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे राज्यात बुधवारी (३० एप्रिल) एकूण २६ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.

बालविवाह रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि समन्वयाबाबत निर्मल भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच विविध जिल्ह्यांतील महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी सहभागी झाले. बैठकीत बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणा, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये प्रभावी समन्वय ठेवण्यावर भर देण्यात आला.

अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नांदेड जिल्ह्यातील भोकर शहर आणि मुखेड तालुक्यातील मंगनाळी गावात होणारे दोन बालविवाह वेळेत हस्तक्षेप करून रोखण्यात आले. या कारवाईमुळे स्थानिक पातळीवर जनजागृती झाली असून, बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा संदेश गेला आहे.

राज्यातील विविध भागांतून आलेल्या अहवालांनुसार, फक्त एका दिवसात २६ बालविवाह रोखण्यात आले. यामुळे महिला व बाल विकास विभागाच्या प्रयत्नांचे फलित स्पष्ट झाले. बालविवाहमुक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प विभागाने केला आहे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणा एकत्र येऊन काम करणार आहे, असे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या.

बालविवाह ही सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या गंभीर समस्या असून, तिचे निर्मूलन करण्यासाठी सर्व स्तरांवर एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ही ठोस पावले बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी उचललेले सकारात्मक पाऊल ठरू शकतात असे बोर्डीकर म्हणाल्या.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!