छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज दिवसाढवळ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धुडगुस घातला. डोक्याला भगवे उपरणे आणि हातात नंग्या तलवारी, लाठ्या-काठ्या घेतलेल्या ३० ते ४० जणांच्या टोळक्यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींना धमकावले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
आज दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान बजरंग दलाच्या ३० ते ४० कार्यकर्त्यांचे टोळके विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशदारातून विद्यापीठ परिसरात घुसले. डोक्यावर भगवे उपरणे, हातात नंग्या तलवारी आणि लाठ्या-काठ्या घेतलेले हे टोळके थेट विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारत आणि ग्रंथालयादरम्यान असलेल्या नारळीबागेत शिरले.
या नारळीबागेत काही विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र बसून डबे खात होते तर काही विद्यार्थी-विद्यार्थिनी अभ्यास करत बसले होते. तेथे घुसलेल्या या ३० ते ४० जणांच्या टोळक्यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा धमकावले आणि त्यांना हुसकावून लावण्यास सुरूवात केली. हातात नंग्या तलवारी आणि लाठ्या-काठ्या घेतलेल्या या टोळक्यांच्या झुंडशाहीमुळे विद्यार्थी-विद्यार्थिनी घाबरले आणि सैरावैर पळू लागले.
बजरंग दलाचे टोळके विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचे कळल्यानंतर काही कार्यकर्ते धावले. अनएसयूआयच्या दीक्षा पवार, रिपब्लिकन बहुजन सेनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राहुल वडमारे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर गुणरत्न सोनवणे, सचिन निकम आदी कार्यकर्ते गोळा झाले. या सर्व कार्यकर्त्यांनी कुलगुरूंच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. बजरंग दलाच्या या टोळक्याविरूद्ध पोलिसांत तक्रार देऊन गुन्हे दाखल करा, अशी या कार्यकर्त्यांची मागणी आहे.