
बुलढाणा: ‘तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊन वर्गात पहिला नंबर मिळवून देतो, त्यासाठी तू आम्हाला खुश कर’ असे आमिष दाखवून दोन शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आईवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मलकापूर शहरातील नामांकित नूतन विद्यालयात हा प्रकार घडला. पीडित महिलेच्या मुलाचा वर्गशिक्षक समाधान इंगळे आणि त्याचा सहकारी शिक्षक अनिल थाटे याने ‘तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊन वर्गात पहिला नंबर मिळवून देतो, त्यासाठी तू आम्हाला खुश कर’ असे आमिष दाखवले. त्यानंतर या दोन नराधम शिक्षकांनी ३४ वर्षीय पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केला.
१९ सप्टेंबर २०२४ ते २२ एप्रिल २०२५ या काळात या दोन शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या पीडित आईवर अनेकदा बलात्कार केला आणि शरीर सुखाची मागणी पूर्ण केली नाही तर तिला आणि तिच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर पीडित महिलेने मलकापूर पोलिस ठाणे गाठून या दोन शिक्षकांविरूद्ध फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून वर्गशिक्षक समाधान इंगळे व त्याचा सहकारी शिक्षक अनिल थाटेविरूद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एम), ७०(१), ३५१ (२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करून दोन्ही नराधम शिक्षकांना अटक केली.
पीडित महिला मूळची मौताळा तालुक्यातील रहिवासी असून मुलांच्या शिक्षणासाठी ती मलकापुरात वास्तव्याला आली आहे. मुलाच्या शैक्षणिक प्रगतीचे आमिष दाखून या दोन नराधम शिक्षकांनी तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. सततच्या लैंगिक अत्याचारामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या पीडित महिलेले हिंमत दाखवून पोलिसांत फिर्याद दिली.
पोलिसांनी या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या दोन नराधम शिक्षकांनी असेच आमिष दाखवून आणखी काही विद्यार्थ्यांच्या आईवर लैंगिक अत्याचार केले असण्याची शक्यता असून पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून आरोपी शिक्षकांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी पुढे येत आहे.