लोकसभा निवडणूक संपताच महायुतीत फूट?; विधान परिषद निवडणुकीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-मनसे एकमेकांविरुद्ध रिंगणात!


मुंबईः लोकसभा निवडणूक संपताच भाजपच्या नेतृत्वातील महायुतीत फूट पडल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजप, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि राज ठाकरेंची मनसेने एकमेकांच्या विरोधात उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात एकजुटीने लढणाऱ्या महायुतीत ही निवडणूक संपताच ताटातूट दिसू लागल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचे काय परिणाम होणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

लोकसभा निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवार जाहीर केले आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपने विद्यमान निरंजन डावखरे यांना पुन्हा संधी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजीत पानसे यांना रिंगणात उतरवले आहे. शिंदेच्या शिवसेनेनेही या निवडणुकीत उडी घेतली आहे. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कोकण भवनातून उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेचाही उमेदवार राहणार हे स्पष्ट झाले आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघातून भाजपने किरण शेलार यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर मुंबई शिक्षक मतदासंघातून शिवनाथ दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्याही विरोधात भाजपने उमेदवार दिला आहे. त्यामुळे महायुतीतच एकी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘बिनशर्त पाठिंब्या’चा आनंद औट घटकेचा!

राज ठाकरेंच्या मनसेने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसह काही सभाही घेतल्या. लोकसभा निवडणुकीत मनसेच्या वाट्याला एकही जागा आली नाही.  लोकसभेत पाठिंबा दिल्यानंतर विधानसभेत आपले उमेदवार महायुतीच्या वतीने उभे करू, असे राज ठाकरे यांनी जाहीरही केले होते.

आता कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजीत पानसे मनसेने यांना उमेदवारी जाहीर केली. भाजप आपल्या उमेदवाराला पाठिंबा देईल, अशी मनसेची अपेक्षा होती पण भाजपने त्यांच्या विरोधात उमेदवार दिल्यामुळे मनसे- भाजपचे सूत फारकाळ टिकणार नसल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

ही विधानसभा निवडणुकांची नांदी?

 एकूणच भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि मनसे या महायुतीतील घटक पक्षांनी एकमेकांच्या उमेदवारांच्या विरोधातच उमेदवार जाहीर केल्यामुळे महायुतीतील बेकी उजागर झाली आहे. ही आगामी विधानसभा निवडणुकींची नांदी तर नाही ना?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

संबंधित बातम्या

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *