उपजाती पाहून विवाह जुळवणाऱ्या बौद्ध व्यक्तींवर सामाजिक बहिष्कार घालाः बुद्ध विहार समन्वय समितीच्या अधिवेशनात महत्वाचा ठराव


छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद):  बौद्धांनी विवाह जुळवताना उपजाती किंवा पोटजातींना मान्यता देऊ नये, असे करणाऱ्या व्यक्तीवर सामाजिक बहिष्कार घालण्यात यावा, असा महत्वाचा ठराव बुद्ध विहारांच्या तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात घेण्यात आला. हा ठरावा सामाजिक बदलाच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगरातील संत एकनाथ रंगमंदिरात दोन दिवसीय बुद्ध विहारांचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. रविवारी या अधिवेशनाच्या समारोपाच्या सत्रात पाच महत्वाचे ठराव घेण्यात आले. त्यात महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी बौद्धांनी सार्वजनिक, खासगी कार्यक्रम तसेच मिरवणुकीत डीजेचा वापर करू नये, पाली विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी आणि विदेशातून भारतात आणण्यात येणाऱ्या बुद्ध मूर्तीवरील कस्टम ड्युटी, सीमा शुल्क रद्द करण्यात यावे या ठरावांचा समावेश आहे.

बुद्ध विहारे ज्ञान केंद्रे व्हावीतः नोगुची

बौद्ध संस्कृती निर्माण करण्यामध्ये बौद्ध विहारांची महत्वाची भूमिका असून बुद्ध विहार हे शिक्षणाचे, ज्ञानाचे केंद्र झाले पाहिजे. केवळ भारतातील बौद्ध विहारांच्या समन्वयाबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरील बौद्ध विहारांमध्ये समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. जेणेकरून बौद्ध संस्कृती जगभरामध्ये रुजवण्यात महत्वाचा वाटा आपण उचलू शकू, असे प्रतिपादन हॅप्पी सायन्स, साऊथ आशिया खंडाचे प्रमुख कोटा नोगुची (जपान) यांनी या अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. ए. वाहुळ हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन, चरित्र व साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे, भदंत डॉ. चंद्रबोधी, डॉ. सय्यद रफिक पारनेर, बहुजन संघटनचे प्रमुख राहुल खांडेकर, इंजि. अशोक येरेकर, प्राचार्य सुनील वाकेकर, चेतन कांबळे, ऍड. एस. आर. बोडदे,  आदींची यावेळी उपस्थिती होती.

विधीसाठी समान कार्यक्रम राबवाः वाहुळ

मुस्लिम, ख्रिश्चन, शीख धर्मात विधी, पूजापाठाचा सारखेपणा आहे, पण बौद्ध धम्मात तो दिसत नाही. त्यामुळे देशभरात बौद्ध धम्मातील पूजापाठ, विधीमध्ये किमान समान कार्यक्रम असावा यासाठी मोहीम राबवण्याची गरज असल्याचे प्राचार्य डॉ. एम.ए. वाहुळ म्हणाले. आपण आपली संस्कृती निर्माण करण्यासाठी, सामाजिक बदलासाठी व्यापक पातळीवर काम करण्याची गरज आहे. उशिराने का होईना त्याची सुरूवात बुद्ध विहार समन्वय समितीने केली आहे, असेही डॉ. वाहुळ म्हणाले.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला सकाळी ८ वाजता पूज्य भदंत डॉ. चंद्रबोधी आणि उपस्थित भिक्खू संघाच्या उपस्थितीत बुद्ध वंदना व सुत्तपठन घेण्यात आले. त्यानंतर अशोक सरस्वती बौद्ध यांच्या अध्यक्षतेखाली खुले चर्चासत्र संपन्न झाले. त्यात प्रदीप चकमा (त्रिपुरा), भेरुलामा बौद्ध (राजस्थान), देवी दयाल फुले (हरियाणा), राजेंद्र भालशंकर (नाशिक ), कैलासचंद खाडिया (राजस्थान), मिलिंद माटे(गोवा), सुब्रम्हणी (तमिळनाडू), बनवरीलाल (दिल्ली), डॉ. ओंकार वानखडे,

शशिकांत सिंहजी मोहनन (तामिळनाडू), विनोद बौद्ध (बिहार), राजेंद्र नरहरी (तेलंगणा), प्रा. बी. के. खातरकर (मध्य प्रदेश), महेंद्र बुद्धरत्न, विमलभाई मकवाना (गुजरात), ज्ञानप्रकाश बौद्ध (गुजरात), ओमप्रकाश चौधरी (छत्तीसगड), ए. के. पाटील (पाली परीक्षार्थी), प्रा. घनश्याम धाबर्डे (लेणी संवर्धन), सावित्री मुकुंद नाखले आदींनी सहभाग नोंदवला.

बुद्ध विहारांचे समन्वय अधिक व्यापक पद्धतीने करून बुद्ध विहार संस्कृती टिकवण्याची जबाबदारी कशापद्धतीने केली पाहिजे यावर व्यापक स्वरूपात चर्चा झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक सरस्वती बौद्ध, सूत्रसंचालन प्रा. भारत सिरसाट यांनी केले तर आभार अमरदीप वानखडे यांनी मानले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!