शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीरः संतोष आळंजकर यांना ‘शेतकरी साहित्य’ तर गणेश घुलेंना ‘संदीप दळवी बालसाहित्य’ पुरस्कार


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य रा.रं.बोराडे संस्थापक असलेल्या शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा शेतकरी साहित्य पुरस्कार संतोष आळंजकर यांच्या ‘रानभुलीचे दिवस’  या ललित गद्यसंग्रहास तर गणेश घुले यांच्या ‘सुंदर माझी शाळा’ या बालकविता संग्रहास संदीप दळवी बालसाहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी कृषक संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या साहित्यकृतीला मागील बावीस वर्षांपासून ‘शेतकरी साहित्य पुरस्कार’ दिला जातो. शिवार प्रतिष्ठानचा ‘शेतकरी साहित्य पुरस्कार’ साहित्यक्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा समजला जातो. यावर्षी २३ वा पुरस्कार येथील संतोष आळंजकर यांच्या ‘रानभुलीचे दिवस’ या ललितगद्य संग्रहास तर स्व. संदीप दळवी यांच्या स्मरणार्थ संदीप दळवी बालसाहित्य पुरस्कार गणेश घुले यांच्या ‘सुंदर माझी शाळा’ या बाल कविता संग्रहास जाहीर करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगरातील (औरंगाबाद) मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ. ना.गो.नांदापूरकर रविवारी (२९ डिसेंबर) सायंकाळी ५:०० वाजता सुप्रसिद्ध विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध लेखक व समीक्षक,ग्रामीण साहित्य चळवळीचे भाष्यकार डॉ. वासुदेव मुलाटे असतील.

‘रानभुलीचे दिवस’ या ललित गद्यसंग्रहावर कवी, अभ्यासक प्रा.रवी कोरडे तर ‘सुंदर माझी शाळा’ या बाल कवितासंग्रहावर अभ्यासक डॉ.जिजा शिंदे हे भाष्य करतील, असे शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठान संयोजन समितीचे डॉ. प्रेरणा दळवी, डॉ. गणेश मोहिते, डॉ. निळकंठ डाके,  डॉ. समिता जाधव, प्राचार्य रेखा शेळके,  डॉ. पुंडलिक कोलते,  डॉ. रमेश औताडे,  डॉ. जिजा शिंदे, श्रीमती आशा देशपांडे, संजीव बोराडे यांनी कळवले आहे.

यापूर्वी ना.धो.महानोर, भास्कर चंदनशिव, शेषराव मोहिते, इंद्रजीत भालेराव, सदानंद देशमुख, आसाराम लोमटे, श्रीकांत देशमुख, भीमराव वाघचौरे, कृष्णात खोत, संतोष पद्माकर पवार, कल्पना दुधाळ, अशोक कौतिक कोळी,  बालाजी मदन इंगळे,  उमेश मोहिते, विजय जावळे,  राजकुमार तांगडे, अमृत तेलंग, संदीप जगदाळे, सुचिता घोरपडे यांच्या सारख्या कृषीसंस्कृतीतील महत्वाच्या लेखकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

का केली पुरस्कारासाठी निवड?

या दशकातील ललित गद्याकडे पहिले तर संतोष आळंजकर यांचे ‘रानभुलीचे दिवस’ मधील ललित लेखन अपेक्षा वाढवणारे आहे. ग्रामीण विश्वाचा पट उलगडताना त्यांचे ललित लेखन वाचकाला गुंतून ठेवण्यात कमालीचे यशस्वी झाले आहे. ग्रामीण संस्कृतीतील माणसांच्या जगण्याच्या संघर्षाचे नानाविध पैलू सहज, हळुवारपणे या लेखातून उलगडत जातात. लेखकाने कृषक संस्कृतीत वाट्याला येणारे कष्ट, हाल,  उपेक्षा व वाताहतीचे चित्र रेखाटन करताना समाज व्यवहारातील अटळ बदलांना अधोरेखित केले आहे. तसेच नव्या काळाने जन्माला घातलेले  बदलते ग्रामीण संवेदनाची ओळख करून देण्यात हे ललित लेखन यशस्वी ठरते.

ग्रामीण लोकजीवन,श्रद्धां,परंपरा चालीरीती सहज व प्रवाही निवेदनाद्वारे जीवनाच्या अंगप्रत्यंग यांसह साकार होते. हे लेखन संस्मरण असले तरी समकालीन सामाजिक, सांस्कृतिक परिप्रेक्ष्यचे अनेक संदर्भ त्यात येतात. हे ‘रानभुलीचे दिवस’ या ललित गद्य संग्रहाचे बलस्थान आहे.

बहुचर्चित ‘हंबरवाटा’ हा त्यांचा कवितासंग्रह देखील सध्या चर्चेत आहे. परंतु आजपर्यंत ललित गद्य वाड्मय प्रकारास शेतकरी साहित्य पुरस्कार दिला गेला नव्हता म्हणून या ललित गद्यसंग्रहाची सहेतुक निवड केली आहे. तसेच ‘सुंदर माझी शाळा’ हा गणेश घुले यांचा बहुचर्चित व बालकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रयोगशील कविता संग्रह आहे. असे पुरस्कार निवड समितीने आपल्या अभिप्रायात म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!