ठाकरे कुटुंबासह ‘मातोश्री’च्या सुरक्षेत मोठी कपात; उद्धव ठाकरेंची झेड प्लस सुरक्षा, ताफ्यातील अतिरिक्त वाहनेही काढली!


मुंबईः मुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळाप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवर ईडीची (सक्तवसुली संचालनालय) छापेमारी सुरू असतानाच शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे कुटुंबींयाबरोबरच  मातोश्रीच्या सुरक्षेतही मोठी कपात केली असल्याची बातमी समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रदान करण्यात आलेली झेड प्लस सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील अतिरिक्त वाहने आणि मातोश्री बाहेरील सुरक्षेतही कपात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ईडीने मुंबई महापालिकेच्या कथित जम्बो कोविड घोटाळा प्रकरणी बुधवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरात कमीत कमी १५ ठिकाणी छापेमारी केली. ज्या लोकांच्या ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली त्यात उद्धव ठाकरे यांच्या टीमच्या जवळच्या लोकांचाही समावेश आहे.

ईडीकडून ज्या ठिकाणांची झाडाझडती घेण्यात येत आहे, त्यात उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय सहकारी सूजर चव्हाण यांचे चेंबूर येथील निवासस्थान, शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय राऊत यांचे निकटचे सहकारी सुजीत पाटकर यांचे सांताक्रुझ येथील निवासस्थानाचाही समावेश आहे. ज्येष्ठ सनदी अधिकारी संजीव जैस्वाल यांच्या परिसराचीही ईडीकडून झाडाझडती घेतली जात आहे.

ईडीची ही कारवाई सुरू असतानाच आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांची झेड प्लस सुरक्षा काढून त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांची वाय प्लस सुरक्षा काढून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. त्यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट वाहनही कमी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

ठाकरे कुटुंबीयांसह मातोश्रीच्या परिसरातील सुरक्षाही कमी करण्यात आली आहे. मातोश्रीवर मागच्या आणि पुढच्या अशा दोन्ही गेटवर पोलिसांचा पहारा असायचा. मात्र या सुरक्षेतही आता कपात करण्यात आली आहे.

एकीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात करण्यात आलेली असतानाच उद्धव ठाकरे यांचे पूर्वीचे स्वीय सहायक आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळेही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

‘त्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही!’

कोणतेही सरकार असू, त्या सरकारने मातोश्रीची सुरक्षा कायम ठेवली होती. आता मातोश्रीची सुरक्षा कमी केली आहे. एवढेच नव्हे तर ठाकरे कुटुंबाची सुरक्षा देखील कमी केली आहे. पाललट व्हॅनही कमी केल्या आहेत. काँग्रेसचे सरकार असले तरीही त्यांनी मातोश्रीला सुरक्षा देण्याचे काम केले होते. शिंदे यांनी ठाण्यात छोट्या छोट्या कार्यकर्त्याला सुरक्षा दिली आहे. मात्र, मातोश्रीची सुरक्षा कमी केली. सुरक्षा कमी केली असली तरी त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही आहोत, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत म्हणाले.

पण मुंबई पोलिस म्हणतात…

दरम्यान, ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात केल्याच्या ठाकरे गटाच्या दाव्यावर मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यांच्या ताफ्यात प्रत्येकी एक अतिरिक्त वाहन होते, ती वाहने हटवली आहेत, असे मुंबई पोलिसांतील एका अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई पोलिसांच्या कार्यक्षेत्रात राहत असलेल्या ज्या व्यक्तींना संरक्षण आहे, त्यांच्या सुरक्षेत कोणतीही कपात करण्यात आली नाही, असे पोलिसांनी एका निवेदनाद्वारे म्हटल्याचे वृत्त द इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!