पुणेः ऐतिहासिक नाटकांचे सादरीकरण अधिक संवेदनशील झाले आहे. वसंत कानेटकर यांनी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटक लिहिले. हे नाटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कौटुंबिक बाबींवर अधिक भाष्य करणारे आहे. सध्याचे प्रेक्षक कुटुंब कलहातले महाराज का दाखवले असा प्रश्न विचारतील आणि त्याचे पुरावेही मागतील, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडा संकुलात आयोजित १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उद्योगमंत्री तथा नाट्य संमेलनाचे निमंत्रक उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते. शरद पवार हे या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
ऐतिहासिक नाटकांचे सादरीकरण हे अधिक संवदेनशील झाले आहे. वसंत कानेटकर यांच्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कौटुंबिक बाबींवर अधिक भाष्य करण्यात आले आहे. आजच्या प्रेक्षकांना या नाटकात महाराज अधिक हतबल झाले आहेत असे वाटते. रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाच्या शिर्षकात जाग म्हणजे उभारी हा अर्थ अभिप्रेत आहे. मात्र नाटकात महाराजांच्या मनातील शल्य अधिक तीव्रतेने दाखवले आहे. हे नाटक मी दिल्लीत पाहिले आहे. सध्याचे प्रेक्षक कुटुंब कलहातले महाराज का दाखवले असा प्रश्न विचारतील आणि त्याचे पुरावेही मागतील, असे पवार म्हणाले.
ऐतिहासिक नाटकांची प्रेक्षक वाट पहात असतात. मात्र सोयीचा इतिहास दाखवणे, इतिहासाचा विपर्यास करणे, इतिहासातील काही खलप्रवृत्तींचे उदात्तीकरण थांबवण्याची गरज आहे. वास्तव इतिहास आणि नाट्यमय घटनांचा मसाला कमी असला तरीही प्रेक्षक ते स्वीकारतील, असेही पवार म्हणाले.
सर्व कलांचा संगम असलेली रंगभूमी सर्वाधिक परिणामकारक माध्यम आहे. नाटकाचा मुख्य उद्देश मनोरंजन असल्याचे भरतमुनी यांनी म्हटले आहे, मात्र नाटकाच्या माध्यमातून प्रबोधन आणि ज्ञानदानाचे कार्य उत्तमरितीने होते. रंगभूमीच्या माध्यमातून अनेक वर्षे लोकप्रबोधनाचे कार्य होत आहे, असेही पवार म्हणाले.
मराठी नाट्यसृष्टीद्वारे नवे विषय मांडले जात आहेत. नाट्य रसिकांना नाटकांकडे आकर्षित करणारी नाटके रंगभूमीवर यावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नाट्य संमेलनाच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागात कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याने नाट्यरसिकांना ही मोठी पर्वणी आहे, असेही पवार म्हणाले.
वृद्ध कलावंताच्या मानधनात वाढ करूः मुख्यमंत्री
मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल तसेच वृद्ध कलावंतांचे मानधन वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे १०० वर्षे ही गौरवशाली परंपरा लाभली आहे. १०० वे नाट्य संमेलन असल्याने नाट्य संमेलनासाठी ९ कोटी ८३ लाख आणि मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासाठी १० कोटींचा निधी देण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाकडून नवी नाट्यगृहे उभारण्यात येणार आहेत. मात्र हे करतांना नाट्य कलावंतांच्या मागणीनुसार जुन्या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईल, असेही शिंदे म्हणाले.
मराठी नाट्य परिषदेसाठी मुंबईत भूखंड देण्याबाबत सहकार्य करण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नाट्यगृहात पूर्वीप्रमाणे विजेचा खर्च आकारला जाईल. ज्येष्ठ कलावंतांच्या घराबाबतही शासन सकारात्मक आहे. नाट्यसृष्टीच्या उत्कर्षासाठी एकत्रित प्रयत्न करताना मराठी रंगभूमीसाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.