मुंबई: अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जवळपास ४० आमदारांना घेऊन भाजपला जाऊन मिळाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही दावा सांगितला. अशा स्थितीत शरद पवारांच्या नेतृत्वातील काँग्रेस पुन्हा उभी राहील का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांच्या राजकारणाबाबत मोठा दावा केला आहे. शरद पवार राज्यात नुसते नमस्कार करत फिरले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा उभा राहील आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार निवडून येतील, असे थोरात म्हणाले.
शरद पवार पक्षाची पुनर्बांधणी करू शकतील असे वाटते का? असा प्रश्न ‘मुंबई तक’च्या ‘चावडी’ कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना थोरात म्हणाले की, शरद पवार राज्यात फिरून विधानसभा आणि लोकसभेला चांगला निकाल आणतील. शरद पवार नुसते नमस्कार करत फिरले तरी राष्ट्रवादी काँग्रेस उभा राहील. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार निवडून येतील.
शरद पवारांनी काँग्रेसमध्ये येऊन राजकारण करावे, असे वाटते का? असा प्रश्नही थोरातांना विचारण्यात आला. त्यावर ‘शरद पवारांनी स्वतंत्रपणे राजकारण केले आहे. काँग्रेस आणि शरद पवारांचा विचार वेगळा नाही. फक्त दोन पक्ष आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आज ज्या पद्धतीने आम्ही चाललो आहोत, त्यातूनच यश मिळेल,असे थोरात म्हणाले.
अजित पवारांच्या बंडावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, काहीतरी शिजत आहे, याचा आम्हाला वास येत होता. अजित पवार हे सभेत फक्त एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल करायचे, पण देवेंद्र फडणवीसांना मोकळे सोडायचे. हे जाणवत होते. महाविकास आघाडी म्हणून आम्ही खूप चांगले होतो. वज्रमूठ सभेमुळे लोकांमध्ये ऊर्जा निर्माण झाली होती,असेही थोरात म्हणाले.
त्यावेळी झालेल्या सर्वेक्षणात महाविकास आघाडीला लोकसभेच्या ३८ आणि विधानसभेच्या १८०जागा मिळतील, असे सांगितले जात होते. त्यामुळे आघाडी फोडण्याशिवाय भाजपपुढे पर्याय नाही, असे वाटायचे. तसे सिग्नल कुठून तरी येत असायचे. ईडी आणि अन्य कारवाया वाढल्या होत्या. हे सुद्धा सिग्नलच होते, असे थोरात म्हणाले.