नवी दिल्लीः हिंडनबर्ग रिपोर्टमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अदानी समूहावरील संकट अधिकच गडद होत चालले आहे. इंडेक्स प्रोव्हायडर एमएससीआयने अदानी समूहाच्या चार कंपन्यांच्या शेअर्सची फ्री फ्लोट स्थिती कमी केल्यामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले आहेत. गुरूवार आणि शुक्रवारी शेअर बाजारात बसलेल्या झटक्यांमुळे अदानी दोनच दिवसांत टॉप २० मधून बाहेर झाले आहेत.
शेअर बाजारातील घसरणीमुळे अदानींचे एका दिवसात २.४ अब्ज डॉलर इतके प्रचंड नुकसान झाले आहे. फोर्ब्स रियल टाइम बिलेनियर्सनुसार अदानींच्या एकूण संपत्तीत १० टक्क्यांहून अधिकची घसरण झाली आहे. म्हणजेच ६.६ बिलियन डॉलर अर्थात ५५ हजार कोटी रुपयांची घसरण झालेली आहे. एक दिवसापूर्वी अदानींची एकूण संपत्ती ६० अब्ज डॉलरहून अधिक होती.
अदानींच्या संपत्तीत झालेल्या घसरणीमुळे ते जगातील टॉप २० अब्जाधीशांच्या यादीतूनही बाहेर झाले आहेत. दोन दिवसांत ते १७ व्या स्थानावरून २२ व्या स्थानावर पोहोचले आहेत. यापूर्वी ते २१ व्या स्थानावरून १७ व्या स्थानावर पोहोचले होते. परंतु शेअर बाजारातील अलीकडच्या घसरणीमुळे त्यांची ५ क्रमांकांनी घसरण झाली आहे.
एमएससीआयने अदानी समूहाच्या भारमध्ये कपात केली आहे. त्यात अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायजेसचाही समावेश आहे. २४ जानेवारी रोजी हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्ट आल्यानंतर हे पाऊल टाकण्यात आल्याचे सांगण्यात येते. अदानी समूहाने शेअर्समध्ये हेराफेरी केल्याचा आरोप हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.