शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय भोसलेंची सेवापुस्तिकाच खोटी, संस्थेच्या सरचिटणीसांनी २६ वर्षांपूर्वी केली होती तक्रार; पण सहसंचालकांकडून कारवाई शून्य


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) निर्धारित केलेली अर्हता धारण करत नसतानाही कन्नडच्या शिवाजी महाविद्यालयात रसायनशास्त्राच्या सहायक प्राध्यापकपदी नियमबाह्य नियुक्ती करण्यात आलेले आणि नंतर त्याच बनावट अनुभवाच्या आधारे याच महाविद्यालयाचे प्राचार्य बनलेले प्रा. डॉ. विजय नानासाहेब भोसले यांनी खोटी सेवापुस्तिका आणि खोटी कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याची तक्रार श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस लक्ष्मणराव मोहिते यांनी १९९१ मध्येच छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांकडे केली होती. परंतु सहसंचालकांनी त्या तक्रारीवर कोणतीच कारवाई केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

प्रा. डॉ. विजय भोसले यांना एम.एस्सी. या पदव्युत्तर पदवीला केवळ ५३ टक्के गुण आहेत. यूजीसीच्या नियमाप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापकपदी (तेव्हाचे अधिव्याख्यातापद) नियुक्तीसाठी पदव्युत्तर पदवीला ५५ टक्के गुण असणे अनिवार्य आहे. असे असतानाही शासन प्रतिनिधीचा समावेश असलेल्या विद्यापीठ निवड समितीने प्रा. डॉ. भोसले यांची २१ सप्टेंबर १९९४ रोजी वरिष्ठ महाविद्यालयात रसायनशास्त्राच्या अधिव्याख्यातापदी निवड केली आहे. वस्तुतः प्रा. डॉ. भोसले यांची शिवाजी महाविद्यालयात रसायनशास्त्राचे सहयोगी प्राध्यापकपदी १ जानेवारी १९९७ पासून रूजू झालेले आहेत, ही बाब मोहिते यांनी २६ ऑक्टोबर १९९९ रोजी केलेल्या तक्रारीत सहसंचालकांच्या निदर्शनास आणून दिली होती.

हेही वाचाः ‘शालार्थ आयडी’प्रमाणेच ‘एचटीई सेवार्थ’मध्येही घोटाळा? बोगस नियुक्त्यांवर वेतन अनुदानाची उधळण, वाचा कन्नडच्या प्राचार्याच्या नियुक्तीचे धक्कादायक प्रकरण

प्रा. डॉ. विजय भोसले हे ३१ डिसेंबर १९९६ पर्यंत कन्नडच्या डॉ. भीमराव आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापक म्हणून नोकरी करत होते. वरिष्ठ महाविद्यालयात त्यांची १९९४ मध्ये निवड झालेली असताना १ जानेवारी १९९७ रोजी ते रूजू झाले आहेत, हे नियमाला धरून आहे का?, असा सवालही मोहिते यांनी या तक्रारीत सहसंचालकांना विचारला होता.

हेही वाचाः प्राचार्यपदी तर दूरच, डॉ. विजय भोसले सहायक प्राध्यापकपदावर नियुक्तीसही अपात्र, कन्नडच्या शिवाजी महाविद्यालयाचा नियुक्ती आदेशही नियमबाह्य!

प्रा. डॉ. भोसले यांनी खोटी सेवापुस्तिका तयार करून आपण वरिष्ठ महाविद्यालयात १९९४ पासून नोकरी करत आहोत, असे दर्शवले आहे. परंतु प्रत्यक्षात डॉ. भोसले हे १९९४ ते १९९६ पर्यंत कनिष्ठ महाविद्यालयातच अध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी १९९६ पर्यंत कनिष्ठ महाविद्यालयातूनच वेतन उचलले आहे. तरीही त्यांनी आपण १९९४ पासून वरिष्ठ महाविद्यालयात नोकरी करत असल्याची खोटी कागदपत्रे तयार केलेली आहेत, या गंभीर बाबीकडेही मोहिते यांनी या तक्रारीत सहसंचालकांचे लक्ष वेधले होते.

हेही वाचाः लोकायुक्तांच्या आदेशानुसार प्राचार्य डॉ. विजय भोसलेंना दोन वेतनवाढी रोखण्याची ‘शिक्षा’, पण आदेश डावलून त्याही परस्पर घातल्या घश्यात!

संस्थेच्या हिताच्या दृष्टीने व संस्थेची बदनामी होऊ नये म्हणून आणि खोट्या पगाराचा व खोट्या नियुक्तीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या प्रकरणाची चौकशी करावी आणि नियमाप्रमाणे जे योग्य असेल तो अहवाल आमच्या संस्थेत पुडील कार्यवाहीसाठी सादर करावा, अशी विनंतीही संस्थेचे सरचिटणीस मोहिते यांनी सहसंचालकांकडे केली होती. या तक्रारीची प्रत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवांनाही देण्यात आली होती. परंतु या तक्रारीवर ना सहसंचालकांनी कारवाई केली ना विद्यापीठाने!

आता तरी सहसंचालक कारवाई करणार का?

शिवाजी महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. विजय भोसले यांच्या मूळ नियुक्तीच झोलझाल असल्यामुळे त्यापुढे त्यांनी घेतलेले पदोन्नती आणि प्राचार्यपदावरील नियुक्तीचे लाभही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. गंभीर बाब म्हणजे लोकायुक्तांच्या आदेशानुसार डॉ. भोसले यांना दिलेली ‘दिलेली दोन वेतनवाढी रोखण्याची शिक्षा’ही त्यांनी ‘पचवली’ आणि लोकायुक्तांच्या आदेशाचा अवमान करून रोखलेल्या या दोन वेतनवाढीही घश्यात घातलेल्या असल्यामुळे आता तरी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय सहसंचालक या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!