आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांचे निधन,भीमगीतांचा बुलंद आवाज हरपला


मुंबई: आपल्या तडाखेबंद आवाजात महाराष्ट्रात भीमगीते सर्वदूर पोहोचवणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांचे केईएम रूग्णालयात निधन झाले. त्या ६२ वर्षांच्या होत्या. त्या ज्येष्ठ गायक विष्णू शिंदे याच्या पत्नी होत्या.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात ४ एप्रिल १९६२ रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्या अतिशय दुर्गम गावात लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचे घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. 

त्यांचे आईवडिल मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचे. वैशाली शिंदे यांचे आई आणि वडिल दोघेही भीमगीते गात असत. भीमगीत गायनाचा वसा त्यांना आईवडिलांकडूनच मिळाला.

वैशाली शिंदे यांचे मूळ नाव दया क्षीरसागर होते. परंतु आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायक विष्णू शिंदे यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या वैशाली शिंदे म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.  लग्नानंतर त्या मुंबईत आल्या. मुंबईत आल्यानंतर त्यांची भेट कवी लक्ष्मण राजगुरू यांच्याशी झाली. 

राजगुरू यांनी वैशाली शिंदे यांना भीमगीत गायनातील अनेक बारकावे शिकवले. त्यातून त्या महाराष्ट्रातील आघाडीच्या गायिका म्हणून पुढे आल्या. भीमगीतांचा जंगी सामना अशी जुगलबंदी गायकी ओळख त्यांनी निर्माण केली होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *