छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी अर्थात पीईएसमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक आणि भाजपशी संबंधित व्यक्तींना हेतुतः घुसवण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील आंबेडकरी समाज संतप्त झाला आहे. संघाच्या ऍनाकोंडापासून बाबासाहेबांची पीईएस वाचवण्यासाठी आंबेडकरी समाज एकवटला असून येत्या २० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा उद्देश केवळ शिक्षण देणे नाही तर बौद्धिक, नैतिक आणि सामाजिक लोकशाही चालना मिळेल अशा पद्धतीने शिक्षण देणे आहे. आधुनिक भारताची हीच गरज आहे आणि भारताच्या सर्व हितचिंतकांनी याचा प्रचार केला पाहिजे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेच्या वेळी म्हणाले होते. परंतु संस्थेचे अध्यक्षपद आपल्याचकडे असल्याचा दावा करणारे डॉ. एस. पी. गायकवाड यांनी संस्थेच्या मूळ हेतुलाच तिलांजली देत आरएसएस आणि भाजपशी संबंधित व्यक्तींची पीईएसच्या सदस्यपदी वर्णी लावली आहे. न्यूजटाऊनने याबाबतचे वृत्त १३ ऑगस्ट रोजी प्रकाशित केल्यानंतर महाराष्ट्रातील आंबेडकरी समाज संतप्त झाला आहे.
पीईएसचा अध्यक्ष असल्याचा दावा करणारे डॉ. एस.पी. गायकवाड यांनी १० ऑगस्ट रोजी पीईएसची केंद्रीय विशेष सभा मिलिंद महाविद्यालयात झाल्याचे दाखवून या सभेत संस्थेच्या सदस्यपदी भाजपचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील माजी आमदार श्रीकांत जोशी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मुख्यमंत्री सचिवालयातील पायाभूत सुविधा प्रकल्प वॉररूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांची वर्णी लावली आहे.
भाजपचे माजी आमदार श्रीकांत जोशी आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासातील माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची पीईएसच्या सदस्यपदी वर्णी लावण्यामागे बाबासाहेबांच्या पीईएसचे भगवीकरण करण्याचा डाव असल्याची शंका आंबेडकरी समाज घेऊ लागला आहे.
सामाजिक परिवर्तनाचे केंद्र म्हणून नावलौकिक असलेली नागसेनवनाची भूमीत आरएसएस आणि भाजपच्या ताब्यात देऊन या भूमीचा लढाऊ इतिहास पुसून टाकण्याचा डाव असल्याचा आरोपही काही कार्यकर्ते करू लागले आहेत.
पीईएसच्या सदस्यपदी आरएसएस आणि भाजपशी संबंधित व्यक्तींची वर्णी लावल्यामुळे आंबेडकरी समाजात डॉ. एस.पी. गायकवाड यांच्याबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत. आता बाबासाहेबांची ही संस्था वाचवण्यासाठी पीईएस बचाव आंदोलन आकाराला येऊ लागले असून २० ऑगस्ट रोजी औरंगाबादच्या नागसेवनातील मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूल येथे दुपारी २ वाजता पीईएस बचाव समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
पीईएसच्या विविध महाविद्यालयात शिकलेले आजी-माजी विद्यार्थी आणि पीईएसचे स्वातंत्र्य अबाधित राखले गेले पाहिजे, अशी प्रामाणिक इच्छा असलेले कार्यकर्ते, नेते आणि नागरिकांनी या बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीत पीईएस बचाव आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.
‘मिलिंद’मध्ये ती बैठक झालीच नाही?
पीईएसच्या विशेष केंद्रीय सभेत एकमताने भाजपचे आमदार श्रीकांत जोशी आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू राधेश्याम मोपलवार यांच्यासह अन्य सहा जणांची सदस्यपदी वर्णी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. पीईएसची ही केंद्रीय विशेष सभा १० ऑगस्ट रोजी मिलिंद महाविद्यालयात झाल्याचे डॉ. एस.पी. गायकवाड यांच्याकडून सांगण्यात आले.
परंतु १० ऑगस्ट रोजी डॉ. एस.पी. गायकवाड एकटेच मिलिंद महाविद्यालयात आले. केवळ- पाच दहा मिनिटे बसले आणि निघून गेले. संस्थेचा अन्य कोणीही सदस्य त्या दिवशी मिलिंद महाविद्यालयात आलेला नव्हता, अशी खात्रीलायक माहिती मिलिंद महाविद्यालयातील सूत्रांनी दिली.
म्हणजेच डॉ. एस.पी. गायकवाड एकटेच मिलिंदमध्ये आले, पाच-दहा मिनिटे थांबले आणि निघून गेले, त्यालाच ते पीईएसची विशेष केंद्रीय सभा म्हणतात की काय? असा सवाल आता विचारला जाऊ लागला असून त्यांची ही कृती बाबासाहेबांना अपेक्षित लोकशाहीविरोधी असल्याचा आरोपही केला जाऊ लागला आहे.