‘पीईएस’मध्ये संघाचा ऍनाकोंडाः आंबेडकरी समाजाच्या संतापानंतर डॉ. गायकवाडांची कल्टी; आता म्हणतात ना बैठक झाली, ना सदस्य नेमले!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या (पीईएस) सदस्यपदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजप समर्थकांची वर्णी लावण्यात आल्यामुळे महाराष्ट्रभरातील आंबेडकरी समाजाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर आणि बाबासाहेबांची संस्था संघाच्या घश्यात घालण्याचा डाव उधळून लावण्यासाठी एकवटलेल्या आंबेडकरी समाजाने नागसेनवनात बैठक बोलावल्यानंतर पीईएसचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड यांनी कल्टी मारली असून पीईएस संस्थेची कोणतीही बैठक झाली नाही आणि संस्थेच्या सदस्यपदी कुणाचीही वर्णी लावली नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धीक, नैतिक आणि सामाजिक लोकशाहीला चालना देण्याच्या उदात्त हेतूने ८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. बाबासाहेबांच्या याच पीईएसच्या सदस्यपदी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड यांनी भाजपचे माजी आमदार श्रीकांत जोशी आणि भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासून सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची वर्णी लावल्याचे वृत्त १३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाले होते.

आवश्य वाचाः बाबासाहेबांच्या पीईएसमध्ये संघाचा ‘ऍनाकोंडा’, संस्थेच्या सदस्यपदी दोन भाजप समर्थकांची वर्णी, ‘महाउपासक’ गायकवाडांकडून ‘रेशीमबागे’ची उपासना!

२७ जुलै रोजी झालेल्या पीईएसच्या विशेष सभेत भाजपचे माजी आमदार श्रीकांत जोशी आणि देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू राधेश्याम मोपलवार यांच्यासह सहा जणांची पीईएसच्या सदस्यपदी नियुक्ती करण्याबाबत चर्चा झाली आणि १० ऑगस्ट रोजी मिलिंद महाविद्यालयात झालेल्या विशेष सभेत या सहा जणांची अंतिम निवड करण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले होते.

डॉ. एस. पी. गायकवाड यांचा हा निर्णय बाबासाहेबांच्या पीईएस आरएसएसच्या घश्यात घालण्याचा डाव असल्याची आक्रमक भूमिका न्यूजटाऊनने घेतली. पीईएसमध्ये आरएसएसच्या ऍनाकोंडाने घुसखोरी केल्याची बाब न्यूजटाऊनने लक्षात आणून दिल्यानंतर महाराष्ट्रभरातील आंबेडकरी समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. गायकवाड यांच्या विरोधात अत्यंत कडवट प्रतिक्रिया उमटल्या.

पीईएसचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित राखले पाहिजे, अशी प्रामाणिक भावना असलेले आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते, नागरिक एकवटले. त्यांनी पीईएस बचाव समिती स्थापन केली. या समितीची आज २० ऑगस्ट रोजी औरंगाबादच्या नागसेनवनातील मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूलमध्ये बैठक बोलावण्यात आली. आज दुपारी २ वाजता होणाऱ्या बैठकीत पीईएस बचावासाठी पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे.

हेही वाचाः बाबासाहेबांच्या पीईएसमध्ये संघाच्या ऍनाकोंडाच्या घुसखोरीमुळे आंबेडकरी समाज संतप्त, २० ऑगस्टला ठरणार आंदोलनाची दिशा

 आंबेडकरी समाजाच्या संतप्त प्रतिक्रिया आणि पीईएस बचावासाठी एकवटलेला आंबेडकरी समाज आंदोलनाचे हत्यार उपसण्याच्या तयारीत असल्याची खबर लागताच संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड यांनी कल्टी मारली आणि पीईएसची अशी कोणतीही बैठक झाली नाही किंवा संस्थेच्या सदस्यपदी कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे. हे वृत्त आपली आणि संस्थेची बदनामी करणारे आहे, असा पवित्राही डॉ. एस.पी. गायकवाड यांनी आता घेतला आहे.

न्यूजटाऊनने केला होता बैठक हा बनाव असल्याचा दावा!

१० ऑगस्ट रोजी मिलिंद महाविद्यालयात पीईएसची केंद्रीय विशेष सभा झाली. या विशेष सभेत श्रीकांत जोशी, राधेश्याम मोपलवार यांच्यासह अन्य सहा जणांची सदस्यपदी अंतिम निवड करण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले होते. परंतु १० ऑगस्ट २०२३ रोजी मिलिंद महाविद्यालयात डॉ. एस. पी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अशी कोणतीही बैठकच झाली नव्हती, बैठक झाल्याचा केवळ बनाव करण्यात आला आहे, असा दावा न्यूजटाऊनने १८ ऑगस्ट रोजीच्या वृत्तात केला होता. १० ऑगस्ट रोजी डॉ. एस.पी. गायकवाड हे मिलिंद महाविद्यालयादत आले, पाचदहा मिनिटे बसले आणि निघून गेले, त्या दिवशी संस्थेचा अन्य कोणताही सदस्य अथवा पदाधिकारी त्या दिवशी मिलिंद महाविद्यालयात आलेला नव्हता, असा दावा न्यूजटाऊनने या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने होता.

मिलिंद महाविद्यालयात येऊन पाचदहा मिनिटे थांबून निघून जाण्यालाच डॉ. एस. पी. गायकवाड हे पीईएसची विशेष केंद्रीय सभा म्हणतात की काय? असा सवालही न्यूजटाऊनने या वृत्तात केला होता. डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केलेल्या खुलाश्यात न्यूजटाऊनच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले असून ‘सदर संस्थेत निवडीबाबतची कोणतीही अधिकृत बैठक झालेली नाही. सदस्य निवडीची प्रसिद्ध झालेली बातमी निराधार असून संस्थेची व माझी बदनामी करणारी आहे,’ असे डॉ. गायकवाड यांनी केलेल्या खुलाश्यात म्हटले आहे.

गायकवाडांच्या खुलाश्यावर अविश्वास, आजची बैठक होणारच!

बाबासाहेबांच्या पीईएसच्या सदस्यपदी आरएसएस-भाजपशी संबंधित व्यक्तींची वर्णी लावण्याचा निर्णय आपल्या अंगलट येत असल्याचे दिसू लागताच संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.पी. गायकवाड यांनी खुलासा करत कल्टी मारली असली तरी आंबेडकरी समाज त्यांच्या या खुलाश्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे पीईएस बचाव समितीने आज (२० ऑगस्ट) दुपारी २ वाजता औरंगाबादच्या नागसेनवनातील मिलंद मल्टिपर्पज हायस्कूलमध्ये आयोजित केलेली बैठक होणारच, असे समितीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केलेला खुलासा अस्पष्ट आणि दिशाभूल करणारा आहे. पीईएसच्या सदस्यपदी श्रीकांत जोशी, राधेश्याम मोपलवार यांची निवड झाल्याची बातमी ज्या तपशीलासह प्रसिद्ध झाली, तो तपशील पाहता माध्यमांना काही स्वप्न पडलेले नाही. ही सहा जणांची नावे हवेतून आली आहेत का? त्यामुळे डॉ. एस.पी. गायकवाडांनी श्रीकांत जोशी, राधेश्याम मोपलवार यांच्यासह अन्य सहा जणांची सदस्यपदी निवड करण्याचा निर्णय घेतलेलाच आहे. आता ते करत असलेला खुलासा आंबेडकरी समाजाच्या डोळ्यात धुळफेक करणारा आहे. त्यामुळे ही बैठक होणार आणि या बैठकीत पीईएस बचावासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरणारच, असे समितीची म्हणणे आहे. आता डॉ. एस.पी. गायकवाड यांचा राजीनामा घेऊनच हे आंदोलन थांबेल, असे समितीने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *