‘गुन्हेगारी पार्श्वभूमी’मुळे पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. पराग काळकरांची नियुक्ती वादात, काँग्रेस नेते वडेट्टीवार म्हणाले…


पुणेः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. प्र-कुलगुरूपदी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करून नेमके काय साध्य करायचे आहे? असा सवाल करत विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राजकीय दबावातून झालेली ही नियुक्ती तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.

 विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात आणि त्यातल्या त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयात कुलगुरूंच्या खालोखाल महत्वाचे पद असलेल्या प्र-कुलगुरूपदावर निवड करताना योग्य ती खबरदारी घेऊनच निवड केली जावी, अशी अपेक्षा असते. परंतु डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती करताना अशी खबरदारी घेण्यात आलेली दिसत नाही.

 काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी डॉ. पराग काळकर यांच्या नियुक्तीवर जोरदार आक्षेप घेतले आहेत. डॉ.पराग काळकर हे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता होते. २०१७१८ या कालावधीत त्यांनी आर्थिक गुन्हे केले होते. पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यात त्यांच्यावर भादंविच्या कलम ४०६,४०९,४२० असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. असे असताना कुठलीही शहानिशा न करता ही नियुक्ती कशी झाली? हा गंभीर प्रश्न आहे. अशाच नियुक्त्या करायच्या असतील तर संपूर्ण प्रक्रिया राबवण्याची गरजच काय? राजकीय नियुक्त्या असतील तरी थोडी खातरजमा करून त्या केल्या जाऊ शकतात. पण अशा नियुक्त्या करून आपण जनतेला  काय संदेश देऊ इच्छितो?, असे ट्विट विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’असा नावलौकिक असलेल्यासावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करून नेमके काय साध्य करायचे आहे? सदर नियुक्ती ही राजकीय दबावातूनच झाली असून ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ऐतिहसिक पार्श्वभूमी आहे. चरित्र जोपासना हे विद्यापीठाचे काम आहे. प्र-कुलगुरुंची निवड हा एक महत्त्वपूर्ण निर्णय असून जो विद्यापीठाच्या भविष्यकालीन वाटचालीवर आणि विद्यापीठाच्या प्रशासन तसेच शैक्षणिक गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम करू शकतो, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

प्र-कुलगुरूपदी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या नियुक्तीने केवळ तत्काळ शैक्षणिक परिदृश्यावर परिणाम होणार नाही तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भविष्यातील वाटचालीवरही त्याचा परिणाम होणार आहे. विद्यापीठात जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची नियुक्ती होत असेल तर हे अतिशय गंभीर आहे. यातून नेमके काय साध्य करायचे आहे?, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.

प्र-कुलगुरू भ्रष्टाचार किंवा गैरवर्तनाच्या कोणत्याही आरोपांपासून मुक्त असावे. तसेच त्यांचा रेकॉर्ड निर्दोष असावे अशी अपेक्षा असते. प्र-कुलगुरूंची स्वच्छ प्रतिमा असावी आणि कोणत्याही प्रकारच्या आरोपाखाली त्यांचे नाव नसावे, अशी अपेक्षा विद्यापीठ शिक्षक-शिक्षकेत्तर संघटनेच्या व विद्यापीठ समुदायाच्या एका वर्गाने व्यक्त केली असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती करण्यामागे नेमके कारण काय?, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!