अयोध्याः राम मंदिराच्या सफाई कर्मचारी महिलेवर वारंवार सामूहिक बलात्कार, आठ नराधम गजाआड


नवी दिल्लीः  उत्तर प्रदेशातील अयोध्येत शुक्रवारी एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर कथित सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली आठ जणांना अटक करण्यात आली आहे. ही विद्यार्थिनी राम जन्मभूमी मंदिरात सफाई कर्मचारीही आहे.

‘द टेलिग्राफ’ने  पीडितेच्या जबाबाच्या आधारे आपल्या वृत्तात म्हटले आहे की, ज्या परिसरात तिच्यावर बलात्कार करण्यात आला, तो परिसर मंदिर नगरीचे उच्च सुरक्षा असलेला भाग आहे. पीडितेने स्थानिक पत्रकारांना सांगितले की, जेव्हा ती पहिल्यांदा २६ ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात गेली, तेव्हा तिची फिर्याद घेण्यात आली नाही. पीडितेच्या म्हणण्यानुसार ती अयोध्या शहरातील एका पदवी महाविद्यालयात बी.ए. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी आहे.

पीडितेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘अयोध्या जिल्ह्यातील सहादतगंज येथील रहिवासी वंश चौधरीने तिला जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ‘मनोरंजना’साठी फिरायला घेऊन जाण्याचा वादा केला केला होता.  तो मला १६ ऑगस्ट रोजी एका गेस्ट हाऊसवर घेऊन गेला आणि मला ओलीस ठेवले. त्याने आपल्या अन्य दोन मित्रांसोबत मिळून माझ्यावर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर आपले तीन अन्य मित्रही माझ्यावर अत्याचार करण्यासाठी बोलावून घेतले.’

 पीडितेने दोन अन्य आरोपींची ओळख विनय कुमार आणि मोहम्मद शारीक अशी सांगितली आहे. ‘ते मला गेस्ट हाऊसवरून बनवीरपूर येथील एका बॅरेजवर घेऊन गेले. तेथे त्यांनी माझ्यावर पुन्हा सामूहिक बलात्कार केला आणि १८ ऑगस्ट रोजी मला सोडून दिले,’ असेही पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

‘मला माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जिविताची भीती होती. कारण त्यांनी आम्हा सर्वांना जिवे मारण्याची धमकी दिली होती, त्यामुळे मी पोलिसांत गेले नाही. परंतु २५ ऑगस्ट रोजी जेव्हा मी मंदिरात जात होते, तेव्हा वंशने पुन्हा माझे अपहरण केले. त्याच्यासोबत उदित कुमार, सतराम चौधरी आणि अन्य दोन लोक होते. त्यांनी कारमध्ये माझ्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु कारने डिव्हायडरला धडक दिली आणि मला त्यांच्या जाळ्यातून सुटका करून घेण्याची संधी मिळाली’, असेही पीडितेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

 पीडितेच्या मते, २६ ऑगस्ट रोजी ती फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेली, परंतु तिची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला नाही. स्थानिक मीडियात पीडितेचा जबाव आल्यानंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून पोलिसांच्या असंवेदनशीलतेवर टिकास्त्र सोडले आहे. ‘अयोध्येत सामूहिक बलात्कार पीडित एका युवतीचा जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यातून उत्तर प्रदेशात वाढत असलेले महिलांचे शोषण आणि अत्याचाराचे मूळ कारण समोर आले आहे. काही असंवेनशील पोलिसांमुळे पीडितेला फिर्याद देण्यासाठी किती खस्ता खाव्या लागल्या आहेत. त्यामुळे आरोपींची भीड चेपते. पीडितेला न्याय मिळाला पाहिजे आणि जबाबदार पोलिसांवरही कठोर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे,’ असे यादव यांनी म्हटले आहे.

‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार, अयोध्येतील कँटोनमेंट ठाण्याचे प्रभारी अमरेंद्र सिंह यांनी सांगितले की, आम्ही तपास केल्यानंतर दोन दिवसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि आठही आरोपींना अटक केली आहे. त्यांना कोर्टातून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पीडितेचा वंशवर विश्वास होता, कारण ती त्याला मागील चार वर्षांपासून ओळखत होती, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *