पुणेः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वीर सावरकर यांच्यावर केलेली घणाघाती टीका आणि या सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचा केलेला पुनरूच्चार यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्तेही आक्रमक झाले असून पुण्यात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट वीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोरच ‘माफीवीर’चे पोस्टर लावले आहे.
पुण्यातील सारसबाग चौकात वीर सावरकरांचा पुतळा आहे. या पुतळ्यासमोर माफीवीर आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या पुराव्याचे फ्लेक्स महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावल्याचे निदर्शनास आले. पुणे शहरात या माफीवीर पोस्टरची चांगलीच चर्चा रंगात आलेली असतानाच एका व्यक्तीने येऊन हे पोस्टर हटवले. ही व्यक्ती सावरकरप्रेमी असल्याचे सांगण्यात येते. जितेंद्र वाघ असे या सावरकरप्रेमीचे नाव सांगण्यात आले.
बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. वीर सावरकर यांनी तुरूंगातून सुटका करून घेण्यासाठी ब्रिटिशांकडे लेखी माफीनामा सादर करून त्यांचा नोकर म्हणून राहण्याची तयारी दर्शवली होती. असे करून एक प्रकारे सावरकर यांनी स्वातंत्र्य लढ्यातील लोकांशी दगाबाजी केली. गांधी, नेहरू, वल्लभभाई पटेलही तुरूंगात होते. परंतु त्यांनी असा कुठलाही माफीनामा लिहून दिला नाही. सावरकरांनी माफीनामा लिहून दिला कारण ते घाबरलेले होते, असा दावाही राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधी यांच्या या घणाघाती टिकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
भारत जोडो यात्रेच्या मार्गावरही ‘माफीवीर’
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून एकीकडे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापलेले असतानाच दुसरीकडे राहुल गांधी यांच्याच नेतृत्वात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेच्या मार्गावरही त्यांच्या वक्तव्याचे पडसाद पहायला मिळत आहेत. भारत जोडो यात्रेच्या मार्गावर ‘माफीवीर’ असे पेंटिंग आढळून आले आहे. दरम्यान, राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांची शेगाव येथील सभा उधळून लावण्याचा इशारा मनसेने दिला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ‘किरकोळ आंदोलन’ अशा शब्दांत मनसेच्या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे.