नवी दिल्लीः ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. उद्या मतमोजणीच्या वेळी पोस्टल बॅलेट्सद्वारे आलेल्या मतांचीच आधी मोजणी केली जाईल. त्यानंतर अर्ध्या तासाने ईव्हीएची मतमोजणी केली जाईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने आज स्पष्ट केले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. निवडणूक आयोगाकडे अनेक राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या पोस्टल बॅलेट्ससह सर्व मुद्यांवर तोडगा काढण्यात आला आहे. भारतीय निवडणूक प्रणाली अशी आहे की, जी निवडणुकीनंतर चौकशीची परवानगी देते, असे राजीव कुमार म्हणाले.
निवडणूक प्रक्रियेबाबत कोणतीही शंका असता कामा नये. जगातील सर्वात मोठ्या मतमोजणी कार्यक्रमादरम्यान मतदान अधिकारी, मतमोजणी एजंट, सुक्ष्म निरीक्षक, रिटर्निंग ऑफिसर, सहायक रिटर्निंग ऑफिसर आणि पर्यवेक्षकांसह लाखो लोक उपस्थित असतात, असेही ते म्हणाले.
आम्ही निवडणुकीदरम्यान सुरू असलेले खोटे नॅरेटिव्ह समजून घेण्यात अपयशी ठरलो. पण आता आम्हाला ते समजले आहे, असे राजीव कुमार म्हणाले. विशेष म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीदरम्यान काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर केलेल्या गंभीर आरोपांवर कोणतेही उत्तर दिले नाही. उलट विरोधी पक्षांनी केलेल्या आरोप हे ‘खोटे नॅरेटिव्ह’ असल्याचे सांगून टाकले.
विशेष म्हणजे अनेक नागरी संघटना आणि राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत आयोगाने जी भूमिका घेतली, त्याबद्दल लोक असंतुष्ट आहेत. ईव्हीएमच्या मुद्यावरून तर निवडणूक आयोग आधीच कटघऱ्यात आहे.
आरोप अमित शहांवर, सफाई मात्र आयोगाकडून
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १५० हून अधिक निवडणूक अधिकाऱ्यांना फोन करून धमकावल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. त्याबाबतही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. कुणी त्या सर्वांना (जिल्हा निवडणूक अधिकारी/ निवडणूक निर्णय अधिकारी) प्रभावित करू शकतो का? आम्हाला सांगा तसे कुणी केले? आम्ही त्या व्यक्तीला दंडित करू, ज्याने हे केले… तुम्ही अफवा पसरवणार आणि प्रत्येकावर संशय घेणार, हे बरोबर नाही, असे राजीव कुमार म्हणाले. निवडणूक आयोगाने रविवारीही असेच स्पष्टीकरण दिले होते. विशेष म्हणजे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आरोप केंद्रीय मंत्री अमित शहांवर केले होते, मात्र त्याबाबतचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे.
१० हजार कोटी रुपये जप्त
या लोकसभा निवडणुकीदम्यान १० हजार कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. हा एक विक्रम आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जप्त करण्यात आलेल्या रकमेच्या ही रक्कम तिप्पट आहे. स्थानिक टीमला त्यांचे काम करण्याचे अधिकार देण्यात आले होते, असे राजीव कुमार म्हणाले. आम्ही ६४२ दशलक्ष मतदारांचा जागतिक विक्रम केला आहे, असा दावाही राजीव कुमार यांनी यावेळी केला.