पुणेः एखादा दारूडा घरातील सोने-नाणे विकून झाले की घरातील भांडीकुंडीही विकून घर चालवतो. सगळे विकून झाले की दारूडा आपले घरी विकून टाकतो. नेहरूंनी कष्टाने उभारलेले कारखाने हे या देशाचा कणा आहेत. मात्र नरेंद्र मोदी तेच कारखाने दारूड्यासारखा विकायला लागला आहे. त्यांची अवस्था एखाद्या दारूड्यासारखी झाली आहे, अशी जळजळीत टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
पुण्याच्या खडकवासला भागात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आपल्या घरातले सोन जेव्हा आपण गहाण ठेवतो आणि ते सोडवता येत नाही, त्यावरून आपले घर आर्थिकदृष्ट्या दुबळे असल्याचा निष्कर्ष काढला जातो. एखादा दारूडा अशावेळी घरातील भांडीकुंडी विकून घर चालवतो. सगळे विकून झाले की दारूडा आपले घरही विकून टाकतो. आज नरेंद्र मोदी तेच करत आहेत की नाही सांगा? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.
घर चालवायला आपल्याला हजार रुपये लागत असतील आणि आपली कमाई ८०० रुपये असेल तर वरचे २०० रुपये कर्ज काढावे लागते. त्याचप्रमाणे मोदी आज कर्ज काढून देश चालवत आहेत. या कर्जासाठी कारखाने विकण्याचा सपाटा त्यांनी सुरू केला आहे. आर्थिकदृष्ट्या या देशाचे वाटोळे करण्याचे काम सुरू आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अत्यंत कष्टाने देश उभा केला. डॉ. होमी भाभा यांच्या संशोधनाच्या आधारावर नेहरूंनी देशात कारखाने उभे केले. ते कारखानेच आज भारताचा कणा आहेत. मात्र तेच कारखाने मोदी दारूड्यासारखा विकायला लागला आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
तुरूंगात जाण्याच्या धाकापोटी सगळे मोदींना हात जोडतातः लोकसभेत बहुतम असेपर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेतच, हे आम्हाला मान्यच आहे. पण आज ईडी, सीबीआयचा धाक आहे. तुरूंगात जाण्याचा धाक वाटतो म्हणून सर्व मोदींना हात जोडतात. त्यांची प्रशंसा करतात. त्यांना अनेक विशेषणे देतात. पण मनातल्या मनात हे कधी जातेय याचीच सर्वजण वाट बघत आहेत, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
चोराच्या मनात चांदणे, तसे मोदींच्या मनात भीतीः बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर मोदी सरकारने बंदी घातली. गुजरात दंगलीनंतर दोन विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी हा दंगलखोर आहे का? याचा विचार केला नाही. केंद्रातही दोनवेळा प्रधानमंत्री केले. चोराच्या मनात चांदणे जसे असते, तसे मोदींच्या मनामध्ये भीती आहे. माझे २००२ चे चारित्र्य पुन्हा लोकांसमोर येऊ नये, म्हणून त्यांनी बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर बंदी आणली. जे जे सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
अदानी मोदींच्या मांडीवर बसलेले… अदानी समूहाने केलेल्या घोटाळ्यामुळे ४३ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तरीही भाजप सरकार अदानी समूहाला एलआयसीचे ७८ हजार कोटी रुपये द्यायला निघाले आहे. या सर्व प्रकरणाचा आता निकाल लागला आहे. पण अदानी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या मांडीवर बसलेले असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार नाही. उलट त्याला एलआयसीचे ७८ हजार कोटी रुपये दिले जातील, असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला.
…तर २०२९ मध्येही ते पुन्हा येतील: मला काही भाजपचे लोक म्हणाले की, आम्ही २०२४ मध्ये परत येऊ. मी त्यांना म्हणालो की, २०२४ च काय, आम्हाला तुरूंगात टाकले तर तुम्ही २०२९ मध्ये देखील परत याल. कुणी विरोधकच शिल्लक ठेवला नाही तर तुम्हाला विरोध कोण करणार? असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.