फडणवीसांनी शिंदे गटाचा गेम केला, माझे ४० भाऊ उपाशी म्हणत सुषमा अंधारेंचे टिकास्र


औरंगाबाद: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा पद्धतशीर गेम करायचे ठरवले आहे. लोकांशी थेट संबंध असलेली खाती शिंदे गटाकडे आहेत आणि मलिद्याची सर्व खाती फडणवीसांकडे आहेत. म्हणजेच माझे ४० भाऊ उपाशी आणि एकटे देवेंद्र फडणवीस तुपाशी आहेत, असे टिकास्त्र शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोडले.

सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. ही महाप्रबोधन यात्रा औरंगाबादेत आली असून आज सायंकाळी टीव्ही सेंटर चौकात त्यांची जाहीरसभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते.

आमचे भाऊ ओवाळून टाकलेले असले तरी ओवाळणी मागणे आपले काम आहे. महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून मी त्यांच्या (शिंदे गटाच्या) सदसदविवेकबुद्धीला हात घालण्याचा प्रयत्न करते. ईडा पिडा टळू दे आणि भावाचे राज्य येऊ दे….असे मी म्हणते. पण भावांचे राज्य काही आलेच नाही, असा टोला त्यांनी लगावला. भावाला राज्य आल्याचा केवळ भ्रम तयार करून दिला आहे. त्यांना फक्त पदे दिली आहेत.पण अधिकार मात्र अजिबात दिलेले नाहीत, असे अंधारे म्हणाल्या.

खात्यांचा विचार केला तर लोकांचा थेट संबंध असलेली खाती शिंदे गटाकडे आहेत आणि मलिद्याची सर्व खाती एकट्या देवेंद्र फडणवीसांकडे आहेत. वित्त, जलसंपदा, गृह अशी खाती फडणवीसांकडे आहेत. हे कमी म्हणून की काय उपमुख्यमंत्रिपदाबरोबरच फडणवीसांनी सहा जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही स्वत:कडे ठेवले आहे. म्हणजेच माझे ४० भाऊ उपाशी आणि एकटे देवेंद्र फडणवीस तुपाशी आहेत. त्यामुळे मला भावांची काळजी वाटते, असे अंधारे म्हणाल्या.

लोकांशी थेट संबंध असलेली खाती शिंदे गटाकडे देऊन त्यांचा पद्धतशीर गेम करायचे फडणवीसांनी ठरवले आहे. अलीकडे सात प्रकल्प महाराष्ट्रातून गेले आहेत. त्यामुळे युवावर्ग चिडला आहे. त्यांनी प्रश्न विचारायला सुरूवात केली तर कोणाला विचारतील? साहजिकच आमच्या उदय सामंतांना विचारतील. शेतकऱ्यांची काही अडचण उद्भवली तर ते प्रश्न कुणाला विचारतील? तर आमच्या अब्दुलभाईंना विचारतील. याच्यात देवेंद्र फडणवीसांचे काहीही नुकसान होत नाही. पद्धतशीर गेम होतो तो शिंदे गटाचाच, असेही अंधारे म्हणाल्या.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *