राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाहीः अजित पवारांचे मोठे वक्तव्य


पिंपरीः राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नाही, आमदारांना निवडणुकांचा खर्च परवडणारा नाही, असे मोठे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते पिंपरीत पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नाही. दोन वर्षे कोरोनामुळे गेली. आता कुठे सुरळीतपणे काम सुरू झाले आहे. निवडणुकांमध्ये किती खर्च करावा लागतो, याची जाणीव आमदारांना आहे. त्यामुळे कोणालाही मध्यावधी निवडणुका परवडणाऱ्या नाहीत. विद्यमान आमदार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करतील, असे वाटते, असे अजित पवार म्हणाले.

मुदत संपलेल्या जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत. मात्र राज्य सरकार जाणीवपूर्वक निवडणुका लांबणीवर टाकत आहे. या निवडणुका घेण्यासाठी वेळ लावण्याचे काहीच कारण नाही. मुंबईतील अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर होते, मग स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यात काय अडचण आहे?, असा सवाल अजित पवारांनी केला.

पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आईवडिलांना शिव्या दिल्या तरी चालेल, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचाही अजित पवार यांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटलांचे विधान हे विनाशकाले विपरित बुद्धी आहे. आईवडिलांना शिव्या देणे ही आपली संस्कृती नाही. वास्तविक कुणीच कुणाला शिव्या देऊ नये. शिव्या दिल्याने बेरोजगारी, महागाईसारखे प्रश्न सुटणार आहेत का? पालकमंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीने असे बेताल वक्तव्य करणे चुकीचे आहे. पाटील यांना मनासारखे मंत्रिपद न दिल्यामुळे ते नाराज असावेत. त्यामुळेच ते अशी विधाने करत असावेत, असेही पवार म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!