लाडक्या बहिणींना २१०० रुपये देतो असे कोणीही म्हटलेलेच नाही, १५०० रुपयांतच लाडक्या बहिणी खूश; मंत्री नरहरी झिरवाळांची पलटी


मुंबईः महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याचा हप्ता आणि दरमहा २१०० रुपये मिळण्याची वाट पहात असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मात्र लाडक्या बहिणींना २१०० रुपये देतो असे कुणीही म्हटलेले किंवा जाहीर केलेले नाही, लाडक्या बहिणी १५०० रुपयांतच खूश आहेत, असे म्हणत दिलेल्या आश्वासनावरून पलटी मारली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयात लाडकी बहीण योजनेचा वाटा महत्वाचा ठरला. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देऊ, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येऊनही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणे सुरू झाले नसल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर टिकास्त्र सोडण्यात येत असतानाच नरहरी झिरवाळांनी ही पटली मारली आहे.

लाडक्या बहिणी नाराज आहेत. कारण त्यांना २१०० रुपयांऐवजी १५०० रुपयेच मिळत आहेत. तेही नियमित मिळत नाहीत, असा प्रश्न मंत्री नरहरी झिरवाळ यांना पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. त्यावर ‘लाडक्या बहिणी नाराज आहेत, असे आपण सांगत असता किंवा विरोधक सांगत असतात. पण सर्व बाजूंनी लाडक्या बहिणी खूश आहेत. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे कोणीही जाहीर केलेले नाही’, असे झिरवाळ म्हणाले.

विरोधकांनी आधी म्हटले की महायुती लाडक्या बहिणींना १५०० रुपये देणार नाही. कारण त्यांच्याकडे १५०० रुपये देण्याची ऐपत नाही. त्यानंतर त्यांनी म्हटले की २१०० रुपये देणार आणि मग १५०० रुपयेच दिले नाही तर २१०० रुपये कसे देणार? अशी टिका केली. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले तर आता २१०० रुपये देण्यावर विरोधक जोर देत आहेत. असा काही प्रकार नाही. लाडक्या बहिणींना १५०० रुपये देखील परिपूर्ण आहेत. लाडक्या बहिणी १५०० रुपयांमध्येच खूश आहेत, असे झिरवाळ म्हणाले.

एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

महिना संपत आला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. एप्रिल महिना संपण्याच्या आत पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. मात्र त्यांनी ठोस तारीख सांगितली नव्हती. त्यामुळे एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिलेले असल्यामुळे लाडक्या बहिणी हप्त्याची वाट पहात आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!