छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): बोगस अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अधीक्षकपदावर नियुक्ती मिळवलेले आणि नंतर सहायक कुलसचिव- उपकुलसचिव अशी पदोन्नतीही देण्यात आलेले विष्णू मारोती कऱ्हाळे यांच्या ‘कृष्णकृत्यां’वर झिलकरी आणि लाभार्थ्यांकडून ‘कुशल प्रशासक’ म्हणून गौरवण्यत येत असलेले कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनीही पांघरूण घातले. विष्णू कऱ्हाळेंच्या बोगसगिरीची लेखी तक्रार करून तब्बल दहा महिने उलटले तरी त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे डॉ. येवले यांचे प्रशासनातील नेमकी ‘कुशलता’ कोणती? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
२००३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अनुसूचित जमातील प्रवर्गातील अधीक्षकाची दोन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात दिली होती. या जाहिरातीला अनुसरून विष्णू मारोती कऱ्हाळे यांनी अर्ज केला होता.
जाहिरातीनुसार अधीक्षकपदासाठी संवैधानिक विद्यापीठाचा पदवीधर आणि किमान ३ वर्षे समकक्ष पदावर काम केल्याचा अनुभव असणे अनिवार्य होते. विष्णू कऱ्हाळे यांनी त्यांच्या अर्जात एम.एस. डब्ल्यू. कॉलेज परभणी येथे १ जून १९९९ ते ३१ मे २००१ या कालावधीत अधीक्षकपदावर आणि ११ जून २००१ पासून अर्ज करण्याच्या तारखेपर्यंत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कनिष्ठ लिपीक टंकलेखक पदावर कार्यरत असल्याचे नमूद केले होते आणि अर्जासोबत तशी अनुभव प्रमाणपत्रेही जोडली होती.
विष्णू कऱ्हाळे यांनी अर्जासोबत सादर केलेले एम.एस. डब्ल्यू. कॉलेज परभणीचे अनुभव प्रमाणपत्रच बोगस आहे. परभणीचे एम. एस. डब्ल्यू. कॉलेज हे कायम विनाअनुदानित महाविद्यालय आहे आणि कऱ्हाळे हे या महाविद्यालयात कधीही पूर्णवेळ कर्मचारी नव्हते, हे महाविद्यालयानेच मान्य केल्याचे पुरावे आणि संदर्भ देऊन दि आंबेडकराईट मूव्हमेंटचे समन्वयक विजय वाहूळ यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आणि कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांच्याकडे २७ जानेवारी २००३ रोजी लेखी तक्रार केली होती.
विष्णू कऱ्हाळे यांनी विद्यापीठ प्रशासनाची दिशाभूल व फसवणूक करून खोटे व अनधिकृत अनुभव प्रमाणपत्र सादर विद्यापीठात अधीक्षकपदावर नियुक्ती मिळवली आहे. त्यामुळे विष्णू कऱ्हाळे यांना विद्यापीठाच्या सेवेतून तत्काळ बडतर्फ करावे, त्यांच्या विरोधात भादंविच्या कलम ४२० अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांनी आजवर घेतलेल्या वेतनाच्या रकमेची व्याजासह वसुली करण्यात यावी, अशी मागणी वाहुळ यांनी केली होती.
तक्रार एक आणि ‘कुशल प्रशासका’चे भलतेच उत्तर!
कुलगुरू आणि कुलसचिवांकडे दिलेल्या लेखी तक्रारीत विष्णू कऱ्हाळे यांनी अर्जासोबत सादर केलेल्या अनुभव प्रमाणावर आक्षेप घेत ते कसे बोगस आहे, हे सप्रमाण सिद्ध करणारे संदर्भ आणि पुरावे देण्यात आले होते. परंतु कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या आदेशानुसार कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी १० मार्च २०२३ रोजी तक्रारदार विजय वाहुळ यांना भलतेच उत्तर दिले. ते असे-
‘डॉ. कऱ्हाळे यांनी अधीक्षकपदासाठी सादर केलेल्या अर्जात एम. एस. डब्ल्यू. कॉलेज परभणी येथे अधीक्षक म्हणून ०१-०६-१९९९ ते ३१-०५-२००१ व कनिष्ठ लिपीक टंकलेखक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे कार्यरत असल्याचे नमूद केले आहे.’
‘डॉ. कऱ्हाळे यांच्या अर्जावर छाणनी समितीने वय ३० वर्षांपेक्षा कमी आहे. एम.एस. डब्ल्यू. परभणी महाविद्यालयात अधीक्षक म्हणून ०१-०६-१९९९ ते ३१-०५-२००१ व कनिष्ठ लिपीक टंकलेखक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे ११-०६-२००१ पासून कार्यरत असा शेरा दिला आहे. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने डॉ. कऱ्हाळे यांची निवड समितीच्या शिफारशीवरून अधीक्षकपदावर अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवड करण्यात आली होती. त्या अनुषंगाने ते अधीक्षकपदावर रूजू झाले होते.’
कुलगुरूंच्या आदेशाने कुलसचिवांच्या स्वाक्षरीनिशी देण्यात आलेले हे उत्तर आणि तक्रारदाराची मूळ तक्रार याचा कुठेच ताळमेळ बसत नाही. कऱ्हाळे यांनी अर्जासोबत सादर केलेले अनुभव प्रमाणपत्र बोगस आहे, अशी तक्रारदाराची पुराव्यानिशी मूळ तक्रार आहे. परंतु कुलगुरूंच्या आदेशाने कुलसचिवांनी दिलेल्या उत्तरात मूळ तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याबाबत चकार शब्दही लेखी उत्तरात नाही.
येवले, साखळेंना मराठी समजत नसेल का?
माझी मूळ तक्रार कऱ्हाळे यांनी सादर केलेल्या बोगस अनुभव प्रमाणपत्राबाबत आहे. असे वाहुळ यांनी वारंवार विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. वाहुळ यांची तक्रार शुद्ध मराठीत आहे. त्यामुळे ती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आणि कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांना समजली नसेल, असे मानण्याचे काहीच कारण नाही. मराठवाड्यासारख्या मराठी भाषिक प्रदेशात उच्च शिक्षण क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मराठी समजलीच पाहिजे, हे अपेक्षित तर आहेच, शिवाय येवले आणि साखळे हे दोघेही मराठी भाषिक कुटुंबातच जन्मलेले असल्यामुळे त्यांना वाहुळ यांच्या तक्रारीतील मूळ मुद्दा चटकन लक्षात यायला उशीर लागणार नाही. परंतु त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही. याचाच अर्थ विष्णू कऱ्हाळेंच्या ‘कृष्णकृत्यां’वर कुलगुरू येवले आणि कुलसचिव साखळे यांनी संगनमताने पांघरूण घातले, हेच स्पष्ट होते.
कुलगुरू म्हणाले, माझ्या काळात ही नियुक्ती थोडीच झाली?
विष्णू कऱ्हाळे यांच्या बोगसगिरीवर विद्यापीठ प्रशासनाने काय कारवाई केली, याचा पाठपुरावा विजय वाहुळ यांनी कुलगुरू येवले आणि कुलसचिव साखळे यांना वारंवार भेटून केला. परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली. विष्णू कऱ्हाळे यांची नियुक्ती माझ्या काळात झालेली नाही आणि सगळ्याच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या बोगस असतील तर मी कुणाकुणावर कारवाई करू? असे उत्तर एका भेटी कुलगुरू डॉ. येवले यांनी दिल्याचे विजय वाहुळ यांनी सांगितले.
नियुक्ती कोणत्याही कुलगुरूंच्या काळात झालेली असली आणि त्या नियुक्तीतील बोगसगिरी विद्यमान कुलगुरूंच्या कार्यकाळात उघडकीस आलेली असेल आणि तसे पुरावे उपलब्ध असतील तर कुलगुरू आणि कुलसचिवांनी त्याविरुद्ध कारवाई करून सार्वजनिक निधीच्या दुरुपयोगाला चाप घालणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे.
परंतु कुलगुरू डॉ. येवले यांनी विष्णू कऱ्हाळेंच्या बोगसगिरीवर कारवाई करणे ‘कुशलतेने’ टाळल्याचे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे बोगसगिरीवर पांघरूण घालणे हीच का कुलगुरू डॉ. येवले यांची प्रशानातील कुशलता? असा सवाल वाहुळ यांनी उपस्थित केला आहे.