मुंबई: राज्यात अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्रांबाबत आलेल्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता राज्यात जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन धोरण आणणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणींबाबत सदस्य रमेश पाटील यांनी शुक्रवारी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याचे उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
जात वैधता प्रमाणपत्र देताना जाणीवपूर्वक विलंब लावला जात असल्याच्या तक्रारी येत असतात. लोकांना त्रास होऊ नये या अनुषंगाने जात पडताळणी समित्यांचे काम पारदर्शकपणे पार पडावे यासाठी नवीन धोरण आणणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची संख्या वाढविणे, कामकाज अधिक गतिमान करण्यावर भर देण्यात येईल. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांना कसे बदलता येईल याबाबतीतही निर्णय घेण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले.
या तारांकित प्रश्नावरील चर्चेत सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला.