पुणेः ‘शिवाजी तो पुराने जमाने की बात है’ असे वादग्रस्त वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात असतानाच कोश्यारींचे धोतर फेडणाऱ्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादीच्या वतीने पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोर डमी राज्यपाल आणून त्याचे धोतर फेडून आंदोलन करण्यात आले. यावेळी काली टोपी हटाओ, महाराष्ट्र बचाओच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘डमी राज्यपाला’चे धोतर फेडून केलेल्या आंदोलनाबरोबरच खऱ्या राज्यपालांचे धोत फेडणाऱ्या किंवा फाडणाऱ्यास जाहीर केलेले एक लाख रुपयांचे बक्षीस चर्चेचा विषय ठरले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात आज पुण्यातील सारसबागेजवळील सावरकर पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी ‘काली टोपी हटाव’च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात काळी टोपी काळे मन, हेच भाजपचे अंतर्मन, भाज्यपाल हटाओ, महाराष्ट्र बचाओ, भगतसिंह कोश्यारी नही चलेगी होशियारी अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी ‘शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली’ होती, असे बिनबुडाचे वक्तव्य करून महाराजांचा अपमान करणाऱ्या सुधांशू त्रिवेदीचाही धिक्कार करण्यात आला.
राज्यपालपदावरील व्यक्तीने संबंधित राज्याची संस्कृती, लोकभावना याचा आदर बाळगला पाहिजे. विद्यमान राज्यपाल महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील आदरणीय व्यक्तींबाबत वारंवार अपमानास्पद वक्तव्ये करत आहेत, ही अत्यंत संतापजनक बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाराष्ट्रातील थोर व्यक्तींबद्दल राज्यपाल वारंवार गरळ ओकत आहेत. त्यातून ते त्यांच्या पर्वाश्रमीच्या पक्षाचा महाराष्ट्रद्वेषाचा अजेंडा राबवत आहेत, अशी टीका यावेळी जगताप यांनी केली.
डमी राज्यपालाचे फेडले धोतरः या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळी टोपी घातलेला डमी राज्यपाल आणला होता. सावरकर पुतळ्यासमोरच या डमी राज्यपालाचे धोतर फेडून निषेध करण्यात आला. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गरळ ओकून अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारीचे धोतर फेडणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस असे बॅनर कालच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात लावले होते. त्याचे पुढचे पाऊल म्हणून आज डमी राज्यपालाचे धोतर फेडून निषेध करण्यात आला.
राज्यपाल जिथे दिसतील तिथे धोतर फेडूः
”महाराष्ट्रातील शिवप्रेमींची तुम्ही परीक्षा बघू नका. राज्यपालांची जर पुढील दोन दिवसांत बदली केली नाही तर या महाराष्ट्रातील शिवप्रेमी राज्यपाल जिथे दिसतील तिथे त्यांचे धोतर फेडतील. याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची राहील.”
- प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, संतोष नांगरे, माजी नगरसेविका प्रिया गदादे, किशोर कांबळे, वनराज आंदेकर, महेश शिंदे, बाबा पाटील, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी, श्वेता होनराव, पार्थ मिटकरी, गणेश मोहिते, मनाली भिलारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी निषेध आंदोलने करून राज्यपाल कोश्यारींचा धिक्कार करण्यात आला.